- दहा दिवस केवळ १० टक्केच कर्मचाऱ्यांची उपस्थिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४. जुलै. २०२०) :- पिंपरी-चिंचवड शहरात आजपासून लॉकडाऊन करण्यात आला आहे. दहा दिवस म्हणजेच २३ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत ही टाळेबंदी असणार आहे. या कालावधीतील पालिकेतील कर्मचारी संख्या देखील कमी करण्यात आली आहे. पालिका कार्यालयातील अधिकारी, कर्मचा-यांची दैनंदिन उपस्थिती पुढील आदेश होईपर्यंत १० टक्के ठेवण्यात येणार आहे. पालिकेच्या सर्व कार्यालयांना या सूचना लागू राहतील.
तथापि, आपत्कालीन, अतिमहत्वाचे व अत्यावश्यक सेवा (पाणीपुरवठा, विद्युत, रुग्णालये, आरोग्य, वैद्यकीय विभागातील) तसेच कोरोनाच्या कामकाजाकरिता ज्या अधिकारी, कर्मचा-यांची नियुक्त्या केल्या असतील. अथवा भविष्यात केल्या जातील. त्यांना लागू राहणार नाही. तसेच कोरोना कामकाजाकरिता नियुक्त केलेले अधिकारी, कर्मचारी वगळून कार्यालयामध्ये विनिर्दिष्ठ केलेल्या मर्यादेमध्ये उपस्थिती अनिवार्य राहिल. कार्यालयात कर्तव्यावर नियुक्त केलेल्या कर्मचा-यांचे कार्यालयीन आदेश विभाग प्रमुखांनी निर्गत करावी. त्याची प्रत प्रशासन विभागात सादर करावी.
ज्या कर्मचा-यांची सद्यस्थितीत कोरोनासाठी नियुक्ती केलेली नाही. तसेच कार्यालयाने 10 टक्के उपस्थितीच्या मर्यादेत पारीत करण्यात आलेल्या आदेशामध्ये ज्या कर्मचा-यांना कार्यालयीन कामकाजाचे आदेश नसतील. अशा कर्मचा-यांची नावे स्वतंत्ररित्या प्रशासन विभागास तात्काळ अवगत करावीत. अधिकारी, कर्मचा-यांनी पालिका कार्यक्षेत्र सोडू नये, असे आदेशात स्पष्ट केले आहे. याशिवाय नागरिकांना पालिकेत प्रवेश न देण्याच्या आदेशात वाढ केली आहे. नागरिकांना २३ जुलैपर्यंत पालिकेत प्रवेश मिळणार नाही.


















