- कामगार व इतरांनादेखील वाहतुकीसाठी पास आवश्यक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४. जुलै. २०२०) :- पिंपरी चिंचवड पालिकेने यापूर्वी वितरित केलेले सर्व प्रकारच्या सवलतींचे पास रद्द करण्यात येत असल्याचे पालिकेने सोमवारी स्पष्ट केले. पिंपरी-चिंचवड शहरातील अत्यावश्यक सेवाअंतर्गत पाससाठी नव्याने पालिकेच्या संकेतस्थळावर अर्ज करावे लागतील. तसेच, शहराबाहेरील पाससाठी पिंपरी पोलीस आयुक्तालयाकडे अर्ज करावा लागेल. शासकीय आदेशांचे पालन न केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा पालिका व पोलीस आयुक्तालयाकडून देण्यात आला आहे.
तसेच शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आजपासून लागू झालेल्या लॉकडाऊनमधून उद्योग क्षेत्राला वगळण्यात आले आहे. या काळात कामगार आपल्या दुचाकीवरून देखील कामावर जावू शकणार आहेत, असे पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्पष्ट केले आहे. कंपनीत जाताना वाहन परवाना कंपनीच्या लेटरहेडवर घेतलेला असावा. कामावर जाताना-येताना ओळखपत्र, वाहन परवाना बाळगणे बंधनकारक आहे, असेही ते म्हणाले.
आस्थापनामधील कार्यरत अधिकारी, कामगारांना एचआर विभाग प्रमुखांनी वाहन परवाना कंपनीच्या लेटरहेडवर निर्गमित करावा. त्याकरिता त्यांना प्राधिकृत करण्यात येत आहे. कंपनी, खासगी मोटार किंवा दुचाकीवरून देखील कामावर जाता येईल. परवाना देताना कर्मचा-याचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, कर्मचा-याचा आयडी क्रमांक, वाहनक्रमांक, कोठून कोठे, कामाची वेळ देण्यात यावी. हा पास २३ जुलैपर्यंत वैध राहील. पासचा दुरुपयोग झाल्यास तात्काळ रद्द करण्यात येईल. तथापी, ज्या औद्योगिक आस्थापनामध्ये कोविडचा रुग्ण आढळून आल्यास बाधित कामगार, अधिकारी कार्यरत असलेल्या युनीटमधील सर्व कामगारांची कोविडची तपासणी स्व:खर्चाने करणे बंधनकारक राहील.


















