न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४. जुलै. २०२०) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १ हजार ३९ शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्यास आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (मंगळवारी) मान्यता दिली.
दरम्यान, प्राथमिक शिक्षकांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी देण्याच्या पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, सरचिटणीस सुप्रिया सुरगुडे, खजिनदार अविनाश ढमाले यांनी केलेल्या मागणीला यश आले आहे. शिक्षकांनाही सातव्या वेतन आयोगानूसार वेतनश्रेणी लागू करण्याची मागणी कर्मचारी महासंघाने केली होती. राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांनीही दोन दिवसांपूर्वी आयुक्तांना आयोग लागू करण्याबाबत सूचना केली होती.
आयोग लागू करण्यासाठी पदवीधर शिक्षक संघटनेच्या पदाधिका-यांच्या समवेत आमदार लक्ष्मण जगताप व आमदार महेशदादादा लांडगे यांच्या मध्यस्थीने मा. आयुक्त यांच्या दालनात बैठकीचे आयोजन होऊन २ फेब्रुवारी २०२० रोजी मनपा प्राथमिक शिक्षकांना आयोग लागू करण्याचा आदेश निर्गमित करण्यात आला होता. परंतु, तांत्रिक अडचणीमुळे पुन्हा मनपा स्तरावर विलंब होत गेला. अखेर शासनाच्या शासन निर्णयातील त्रुटीची दुरुस्ती वा शुद्धीपत्रक शासनाकडून सद्यस्थितीत होण्याचे चिन्ह दिसत नसल्याने मनपा स्तरावरच साधारण १ हजार ३९ कार्यरत व सेवानिवृत्त शिक्षकांच्या वेतनश्रेण्या पडताळणी करून मान्यतेसाठी शिक्षक संघटनेच्या आग्रहाला पाठींबा दर्शवत महापौर उषा उर्फ माई ढोरे, पक्षनेते नामदेव ढाके, उपमहापौर तुषार हिंगे, शिक्षण समिती सभापती मनिषा पवार यांनी मा.आयुक्त यांच्याकडे शिक्षकांना आयोग लागू करण्याची आग्रहाची मागणी केली व आज दि १४ जुलै रोजी या आदेशावर आयुक्त यांची स्वाक्षरी झाली. त्यामुळे साधारण १ हजार ३९ मनपा कार्यरत व सेवानिवृत्त शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सुधारित वेतनश्रेणीनुसार वेतन व भत्ते अदा करताना सरकारच्या निर्णयाच्या तरतुदींची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. हे विहित मुदतीत करावे याबाबतची माहिती आयुक्तांनी आदेशात दिली आहे.


















