न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. जुलै. २०२०) :- डासामुळे हिवताप, डेंग्यू , चिकुनगुनिया असे आजार होतात. या रोगाचा प्रसार थांबविण्यासाठी घरात व परिसरात पाणी साचून राहणार नाही, याची दक्षता घ्यावी आणि डासोत्पत्ती होऊन देण्याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने नागरिकांना केले आहे.
डासोत्पत्ती होऊ नये म्हणून घरात पाण्याची मोठ्या प्रमाणात साठवण करून ठेऊ नये. दर आठवड्याने साठवलेले पाणी एकदा पूर्णपणे वापरून ड्रम कोरडा करून सुकवून परत भरावा. त्यामुळे पाण्यातील डासांची अंडी किंवा अळ्या नष्ट होतील; तसेच घराभोवतीच्या साठलेल्या पाण्याची डबकी बुजविली किंवा साचलेले पाणी वाहते केल्यास डासांचा उत्पत्तीस आळा बसेल. पाण्याच्या टाक्या पूर्णपणे झाकण टाकून बंद ठेवाव्यात म्हणजे डासोत्पत्ती होण्यास आळा बसेल.
फ्लॉवर पॉट, कुलर, मनीप्लॅन्ट, घरातील छोटे शोभेचे कारंजे, फ्रिजचा खालचा ट्रे अशा ठिकाणी पाणी साचते. दर आठवड्यात या वस्तूतील पाणी बदलावे. अंगणात किंवा गच्चीवर टाकलेल्या भंगारात पाणी साचून डासांची उत्पत्ती होते. ते भंगार साहित्य काढून टाकावे, असे आवाहन पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन सावळे यांनी केले आहे.


















