न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. जुलै. २०२०) :- पिंपरी-चिंचवड शहरात करोनाच्या पार्श्वभूमीवर दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. पहिल्या दिवशी पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला असून शहरातील चौक, गल्ली, रस्ते आणि परिसर हे सामसूम झाले होते.
पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांनी प्रत्येक चौकात नाकाबंदी करून नियमांचे पालन करणाऱ्या विरोधात कठोर पावलं उचलली आहेत. चिंचवडगावातील चापेकर चौक आणि पिंपरीतील शगुन चौक परिसरात पोलिसांनी नाकाबंदी केली होती. येथून जाणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी पोलिसांकडून केली जात होती.
मात्र, औद्योगिक वसाहतीमधील बहुतांश कंपन्या सुरू होत्या. त्यामुळे दुचाकी व बसमधून कामगार ये – जा करीत असल्याने देखील रस्त्यावरून वाहनांची वर्दळ कायम होती. पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर उतरविण्यात आला होता. सर्व व्यवहार बंद असले, तरीदेखील मेट्रोच्या कामाला यामधून वगळण्यात आले होते. त्यामुळे मेट्रोचे कामकाज सुरू होते.


















