- आयुक्तसाहेब बिल रोखा; अन्यथा राज्य शासनाकडे करणार तक्रार – आ. अण्णा बनसोडे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. जुलै. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी भाजप ठेकेदारांची बिले मंजूर करण्यात व्यस्त आहे. महापालिकेने घाईघाईत २०८ कोटी ४० लाखांची बिले मंजूर करण्यास स्थायीने मान्यता दिली असून, ती कोणत्या कामाची आहेत? ज्या कामांसाठी ही बिले अदा करण्यात येणार आहेत; ती कामे पूर्ण झाली का? त्याचा दर्जा काय? त्यातील त्रुटी किती ? याची पाहणी कोणी केली? याचा महापालिका प्रशासनाने अद्याप खुलासा करणे बाकी आहे.
महापालिकेने कोरोनाच्या काळात लोकहित पाहण्याऐवजी महापालिका प्रशासन ठेकेदारांच्या हितासाठी काम करताना दिसून येत असून, याला शहरातील सत्ताधारी भाजपचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा कारणीभूत असल्याचे दिसून येते. शहरातील आठ प्रभाग कार्यालय, उद्यान, बीआरटीएस आणि मुख्य कार्यालयातील ६०९ कामाचे हे पैसे देण्यात येणार असल्याचे ठरावात नमूद करण्यात आले आहे. वास्तवात सध्याची परिस्थिती पाहता कोरोना रोखण्याकरीता नागरिकांसाठी खर्च करण्यास पैसे नसल्याचे कारण सांगत CSR फंड गोळा केला जात आहे. तर दुसरीकडे कोट्यावधी रुपये ठेकेदारांना मिळवून देण्यासाठी हेच प्रशासन आणि भाजप नेते धडपडताना दिसून येतात.
एकट्या स्थापत्य विभागाची बिले एकाच वेळात एवढ्या मोठ्या प्रमाणात देण्यामध्ये नेमके कोणाचे हित जपले जात आहे, हे पाहण्याची गरज आहे. त्याच बरोबर जोपर्यंत प्रशासनाकडून त्याबाबतचा खुलासा होत नाही, तोपर्यंत ही बिले अदा करण्यात येऊ नयेत. कोरोनाच कहर रोखण्यात दोन विभागांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून येतो. तर दुसरीकडे ठेकेदारांची बिले अदा करण्यासाठी मात्र, सर्व प्रशासन तत्परतेने काम करत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी सर्व प्रथम ही बिले अदा करण्यास रोख लावण्यात यावा, अन्यथा राज्य शासनाच्या संबंधित विभागांकडे याबाबत तक्रार करण्यात येणार आहे.


















