न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६. जुलै. २०२०) :- शहरात करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे महापालिका तसेच, खासगी रुग्णालयांत करोनाबधित रूग्णांना बेडची संख्या अपुरी पडत आहे. त्यामुळे पालिकेने नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडिमयच्या मैदानात करोनाचे तात्पुरते रूग्णालय (कोविड केअर सेंटर) तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
हे रुग्णालय मगर स्टेडियममधील मैदानातील ५. १५ एकर जागेत उभे केले जाणार आहे. या रूग्णालयासाठी करण्यात येणाऱ्या विदयुत कामासाठी एमईपी सिस्टीम सोलुशन्स प्रा. लि. यांची सल्लागार म्हणून नियुक्तीस स्थायी समितीने बुधवारी (दि. १५) झालेल्या सभेत ऐनवेळी मंजुरी दिली. या सभेच्या अध्यक्षस्थानी संतोष आण्णा लोंढे होते.
रूग्णालयासाठी विदयुतीकरण करणे, जनरेटर बसविणे, अग्निप्रतिबंधक यंत्रणा, पाण्याचे पंप, वॉटर हिटर, वॉटरप्युरिफायर, अंतर्गत सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणा बसविणे आदी कामाचे नियोजन करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती केली आहे. या कामाच्या मोबदल्यात सल्लागारास केवळ एक रूपया मानधन दिले जाणार आहे.