न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. जुलै. २०२०) :- कुख्यात तडीपार गुंड बजा वाघेरे याला पोलिसांनी अटक केली. अंमली पदार्थ विरोधी पथकाने शुक्रवारी (दि. १७) ही कारवाई केली. बजा ऊर्फ बजरंग रमेश वाघेरे (वय ३०, रा. पिंपरीगाव) असे अटक केलेल्या कुख्यात तडीपार गुंडाचे नाव आहे.
तर, अक्षय भोसले याला ‘ एमपीडीए ‘ ( झोपडपट्टी दादा विरोधी कायदा) कायद्याखाली अटक करून त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. अक्षय दिलीप भोसले (वय २२, रा. पापड गल्ली, पवनानगर, काळेवाडी) असे त्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बजा वाघेरे याला पुणे जिल्ह्यातून दोन वर्षाकरता तडीपार करण्यात आले आहे. त्याची तडीपारीची मुदत जानेवारी २०२१ मध्ये संपुष्टात येणार आहे. मात्र त्यापूर्वीच तो पिंपरी चिंचवड शहरात आला असल्याची माहिती सहायक उपनिरीक्षक शाकीर जिनेडी आणि पोलीस कर्मचारी संदीप पाटील यांना मिळाली. त्यानुसार शुक्रवारी सापळा लावून बजा वाघेरे याला अटक केली.
तर, अक्षय भोसले याच्यावर २०१६ पासून प्राणघातक हत्यारे बाळगणे, दंगल करून तोडफोड करणे, गंभीर दुखापत करणे पाच गुन्हे दाखल आहेत. वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर आणि सहाय्यक निरीक्षक हरीष माने यांनी प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव, उपायुक्त विनायक ढाकणे यांच्या मार्फत अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे यांच्याकडे सादर केला. पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी शिक्कामोर्तब केले.















