- पालिका एका प्रकल्पाला देणार सानेंचे नाव; महासभा २० ऑगस्टपर्यंत तहकूब…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१. जुलै. २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दत्ता साने यांना श्रद्धांजली वाहून सर्वसाधारण सभा महिनाभर म्हणजे २० ऑगस्टपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. साने यांचे नाव पालिकेच्या एका प्रकल्पास देण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून पालिकेने प्रथमच सोमवारी (दि. २०) ऑलनाइन सभा आयोजित केली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर उषा ढोरे होत्या. सभेत सुमारे ४० ते ५० नगरसेवकांनी सहभाग घेतला.
राष्ट्रवादीचे नगरसेवक साने यांचा ४ जुलैला कोरोनामुळे चिंचवडच्या आदित्य बिर्ला रूग्णालयात मृत्यू झाला. त्यांना सर्वपक्षीय नगरसेवकांनी श्रद्धांजली वाहिली. पक्षनेते नामदेव ढाके, माजी पक्षनेते एकनाथ पवार, उपमहापौर तुषार हिंगे, विरोधी पक्षनेते नाना काटे, शिवसेनेचे गटनेचे राहुल कलाटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे, माजी महापौर राहुल जाधव यांनी साने तसेच, प्रभागात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहली.
तसेच, सीमा साळवे, सुजाता पालांडे, आशा शेंडगे, माऊली थोरात, स्वीनल म्हेत्रे, अंबरनाथ कांबळे, राजेश गावडे, झामाबाई बारणे, बाबासाहेब त्रिभुवन, मोरेश्वर शेडगे, संदीप वाघेरे, अर्चना बारणे, करूणा चिंचवडे, अर्पणा डोके, अजित गव्हाणे, राजू मिसाळ, चंद्रकांत नखाते, सुवर्णा बु-हाडे, अभिषेक बारणे यांनी मनोगत व्यक्त केले. नगरसेवकांसह माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्त्यांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. ही शहरासाठी गंभीर बाब आहे.
नगरसेवक दत्ता साने हे सक्रिय नगरसेवक होते. पालिकेच्या एका प्रकल्पास त्यांचे नाव दिले जावे, ही त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी सूचना माजी पक्षनेते एकनाथ पवार व उपमहापौर तुषार हिंगे यांनी सभागृहात मांडली. त्यास पक्षनेते नामदेव ढाके यांनी सहमती दिली. ते म्हणाले की, सर्व गटनेत्यांची बैठक घेऊन त्या संदर्भात निर्णय घेऊन कार्यवाही केली जावी. त्यास महापौरांनी अनुमती दिली.
सुमारे अडीच तास श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केल्यानंतर सभा पुढील महिन्यात २० तारखेपर्यंत दुपारी पावणेदोनपर्यंत तहकूब करण्यात आल्याचे महापौर ढोरे यांनी जाहीर केले.