न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७. जुलै. २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांना कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार करीत असताना कोरोनाचे संक्रमण होत आहे. त्यामुळे डॉक्टर व इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या प्रकृतीवर देखरेख ठेवण्यासाठी पालिका प्रशासन त्यांना स्मार्ट बॅण्ड देणार आहे.
स्मार्ट बॅण्डमुळे त्यांचे शारीरिक तापमान, ह्रदयाची गती, झोपेच्या गुणवत्तेवर देखरेख ठेवली जाणार आहे. कोरोबाधित रुग्णावर उपचार करताना पालिकेच्या डॉक्टर व इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना संसर्ग होत आहे. त्यामुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. वर्ग १ व २ मधील डॉक्टर व इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या प्रकृतीवर देखरेख ठेवण्यासाठी आर्टिफिशीअल सीय इंटेलेजिन्सचा उपयोग करून डॅशबोर्डसह शारीरिक तापमान, हृदयाची गती, झोपेची गुणवत्ता यावर देखरेख ठेवली जाणार आहे.
त्यासाठी एका खासगी कंपनीने तयार केलेल्या स्मार्ट बॅण्डचे एकूण ३५० नग पालिका थेट पद्धतीने खरेदी करणार आहे. हे स्मार्ट बॅण्ड हाताच्या मनगटावर घड्याळाप्रमाणे लावले जातात. एक नग स्मार्ट बॅण्डचा दर ३ हजार रूपये आहे. त्यासाठी एकूण १० लाख ५० हजार रूपये खर्च अपेक्षित आहे. हा खर्च आयडीबीआय बँकेने सीएसआर निधीस दिलेल्या मदतीतून केला जाणार आहे.