- वेदांता सोसायटीचा इतर सोसायटींनी देखील घ्यावा आदर्श…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७. जुलै. २०२०) :- वाकड येथील वेदांता हौसिंग सोसायटीच्या वतीने कोविड केअर सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. त्यासाठी सोसायटीच्या आवारातील २ सदनिका व क्लब हाऊसमध्ये सुमारे १० बेड्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
या सोसायटीत प्रामुख्याने आयटी कर्मचारी राहतात. सोसायटीतील रहिवाशांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शहरातील इतर मोठ्या सोसायटीमध्ये देखील हा उपक्रम राबविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या येथे ३ रुग्ण उपचार घेत असून, त्यांच्या परिवारातील इतर ३ जणांचे विलगिकरण करण्यात आले आहे. रुग्णांना त्यांचे डॉक्टर ऑनलाईन स्वरूपात व आवश्यकता भासल्यास स्वतः उपस्थित राहून उपचार करून देत आहेत.
सोसायटीच्या वतीने आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, आवश्यकता भासल्यास ऑक्सिजचे सिलिंडरही देण्यात येत आहेत.
वेदांता हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सोमनाथ धोंडे म्हणाले, कोरोना संसर्ग झालेले रुग्ण या उपक्रमामुळे सोसायटीच्या आवारातच राहतील. त्यासह त्यांच्या नातेवाईकांना त्यांच्या सदनिकेत विलगिकरन न करता सोसायटीच्या आवारात ठेवण्यात येत आहे. त्यामुळे सोसायटीच्या इतर नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता देखील कमी होणार आहे. शहरातील इतर सोसायटींनी देखील याचे अनुकरण करावे.