न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७. जुलै. २०२०) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे दरवर्षी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते. १ ऑगस्ट रोजी अण्णाभाऊंची १०१ वी जयंती आहे. जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या मूल्यांचा प्रबोधन, प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी पालिकेने पुढाकार घ्यावा. तसेच चिखली गावातील अण्णाभाऊ साठे समाज मंदिराचा विस्तार करून दोन मजली इमारतीची उभारणी करावी, अशी मागणी ‘ फ ‘ प्रभागाचे स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांनी महापालिका आयुक्त व भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, चिखलीतील महादेवनगर येथे आण्णाभाऊ साठे समाज मंदिर आहे. या ठिकाणी मांतग समाजाचे कार्यक्रम होत असतात. समाजाला उठण्या-बसण्यासाठी ते हक्काचे ठिकाण आहे. अनेक गोरगरीब नागरिकांचे वाढदिवस, सांस्कृतिक कार्यक्रम त्या ठिकाणी होतात. मात्र, अपुऱ्या जागेमुळे समाजबांधवांना अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे या ठिकाणी दोन मजली इमारत बांधली तर, अनेक गोरगरीब नागरिकांना त्याचा मोठा फायदा होईल.
सध्या त्या ठिकाणी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह नाही. या सुविधादेखील इमारतीचे काम झाल्यावर होतील. चालु वर्षे हे अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षे आहे. समाज बांधवाचा विचार करुन पालिकेने किंवा आमदार निधीतून लवकरात लवकर या जागी अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने दोन मजली सर्व सोयी-सुविधा असणाऱ्या समाज मंदिराची उभारणी करावी. त्यासाठी विशेष आर्थिक तरतुद करावी, असे यादव यांनी म्हटले आहे.