- आयुक्तसाहेब संस्थाचालकांवर कारवाई करा; अन्यथा पालिका भावनासमोर ठिय्या आंदोलन..
- शहर भाजप युवा नेते पांडाभाऊ साने यांचा आयुक्तांना इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७. जुलै. २०२०) :- कोविड-१९ या महामारीमुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे, परिणामी सर्वसामान्य नागरिकांसह मध्यमवर्गीय पालकही आर्थिक संकटात आहेत. परंतु पिंपरी चिंचवड शहरातील खासगी शाळा पालकांकडून अशा कठीण परिस्थितीतही सक्तीने फीस वसुली करीत आहेत. एवढेच नव्हे तर हमीपत्र लिहून घेऊन पाल्यांची जबाबदारी पालकांवर लादून स्वतः मात्र शाळा प्रशासन हात झटकु कारभार करीत आहे. एवढेच नव्हे, तर ज्या पालकांनी शुल्क भरले, केवळ त्यांच्याच पाल्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. यासाठी पालकांना वेठीस धरले जात आहे. लॉकडाऊनच्या काळात शुल्क वसुली करू नये, अशा सूचना प्रशासनाकडून असताना ऑनलाईनच्या नावाखाली ही वसुली सुरू आहे. याबाबत भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे आणि महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ठोस भूमिका घेत, अशा अडेलतट्टू खासगी संस्थाचालकांवर कारवाई करीत पालकांना दिलासा दयावा, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर भाजपचे युवा नेते पांडाभाऊ साने यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरात कोरोनामुळे शाळा केव्हा सुरू होणार यांचे आदेश आलेले नाहीत. शहरातील १०० टक्के विद्यार्थी शिकण्याच्या प्रवाहात कसे जोडता येतील या उद्देशाने ऑनलाईन शिक्षणाचे निर्देश शिक्षण विभागाने दिलेले आहे. परंतु, शहरातील नामांकित खासगी शाळांकडून शाळा सुरू करण्याच्या सूचना नसताना पालकांकडून फीस वसुली सुरू आहे. एवढेच नव्हे तर फीस भरली नाही, तर विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासेसमध्ये सहभागी करू घेतले जाणार नाही, असे सांगितले जात असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पालकांसमोर संकट उभे राहिले आहे.
ज्या मुलांच्या पालकांनी शुल्क भरले. त्यांचे ऑनलाईन क्लास सुरू झाले आहेत, तर ज्यांनी भरले नाही त्यांना शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. पाल्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, याकरिता नाइलाजाने पालक शुल्क भरत आहे. यामध्ये बस चार्ज, लंच चार्ज, स्पोर्ट फी देखील घेतली जात आहे. या सर्व प्रकारामुळे पालकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पालिका आयुक्त हर्डीकर यांनी पुढाकार घेऊन, अशा खासगी संस्थाचालकांवर कारवाई करावी व सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाच्या प्रवाहात आणून पालकांना दिलासा द्यावा. येत्या आठ दिवसात याबाबत पालिका आयुक्तांकडून कोणताही ठोस निर्णय झाला नाही तर, पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर पालकांच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या पत्रकाद्वारे साने यांनी आयुक्तांना दिला आहे.
”सध्या अनेक खासगी शाळांकडून विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिकवणी सुरू आहेत. परंतु, या शिकवणी दरम्यान एखाद्या विद्यार्थ्यास काही समजले नाही तरीही प्रश्न विचारणा करण्यास परवानगी दिली जात नाही. ऑनलाईन शिकवणी दरम्यान केवळ विद्यार्थ्यांनी शिक्षक सांगतील तेवढेच ऐकून घ्यायचे आहे. प्रश्न विचारायचे नाहीत, असे धोरण अवलंबले जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे”.
– पांडाभाऊ साने (युवा नेते, शहर भाजपा).