न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८. जुलै. २०२०) :- सत्ताधारी भाजप नगरसेवकाने रविवारी रात्री दादागिरीची भाषा वापरत डॉक्टरांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ वायसीएममधील डॉक्टरांनी सोमवारी सकाळी काम बंद आंदोलन केले होते. जोपर्यंत संबंधित भाजपच्या नगरसेवकावर फौजदारी गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही काम बंद ठेवणार असल्याचा पवित्रा डॉक्टरांनी घेतला होता.
दरम्यान पिंपरीगाव येथील नगरसेवक संदीप वाघेरे यांना भारतीय जनता पार्टीकडून शिस्तभंगाची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तीन दिवसात त्यांच्याकडून खुलासा मागविला असून समाधानकारक खुलासा न केल्यास कारवाई करु, असे सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी सांगितले.
त्यांच्या गैरवर्तनामुळे पक्षाला बाधा निर्माण होत असून समाधानकारक खुलासा न आल्यास त्यांच्यावर पक्षाच्या वरिष्ठांशी बोलून योग्य ती कारवाई करण्यात येईल. तसेच यापुढे भाजप नगरसेवकांनी पक्ष विरोधी काम केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.


















