न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९. जुलै. २०२०) :- निगडी येथील संत तुकाराम व्यापार संकुलातील शिधापत्रिका कार्यालय ( परिमंडळ कार्यालय ) गुरुवारपासून पूर्ववत सुरू होणार आहे. कार्यालयातील तीन कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याने कार्यालय दोन टप्प्यांमध्ये पाच – पाच दिवस बंद करण्यात आले.
शिधापत्रिका कार्यालयात लिपिक सुरुवातीला करोनाबाधित झाल्याचे आढळले. संबंधित लिपिक उपचारानंतर बरा झाला. त्यामुळे १५ तारखेपासून पुढील पाच दिवसांसाठी १९ तारखेपर्यंत कार्यालय बंद करण्यात आले. त्यानंतर कार्यालयातील महिला लिपिक आणि पुरवठा निरीक्षक यांना देखील अस्वस्थ वाटू लागले. त्यांनाही करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
महिला लिपिकाला आळंदीतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेले आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे. तर, पुरवठा निरीक्षकावर पिंपरीतील जिजामाता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन कर्मचाऱ्यांना नव्याने करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने शिधापत्रिका कार्यालय पुन्हा २५ तारखेपासून २९ तारखेपर्यंत बंद करण्यात आले आहे.
परिमंडळ अधिकारी दिनेश तावरे म्हणाले, परिमंडळ कार्यालयामध्ये तीन कर्मचारी करोनाबाधित सापडले. कर्मचारी करोनाबाधित झाल्याने अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांशी ( पुणे ) पत्रव्यवहार करून कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन टप्प्यांमध्ये कार्यालय बंद केले होते.


















