न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९. जुलै. २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड येथील ऑटोक्लस्टर सभागृहाशेजारच्या प्रदर्शन हॉलमध्ये २५० बेडचे (खाटा) कोरोनाबाधितांवर उपचाराचे तात्पुरते रूग्णालय येत्या १५ दिवसांत उभारण्यात येणार आहे. त्या दृष्टीने पालिका प्रशासनाकडून वेगात तयारी सुरू आहे.
शहरात कोरोनाचे रूग्ण झपाट्याने वाढत आहेत. शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा १८ हजारांच्या पुढे गेला आहे. दिवसेंदिवस भरच पडत आहे. त्यामुळे पालिका व खासगी रुग्णालय तसेच, कोविड केअर सेंटर अपुरे पडत आहेत. त्यामुळे पालिकेने चिंचवडच्या ऑक्टो क्लस्टर येथे तात्पुरते रूग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रदर्शन हॉलमध्ये ५० आयसीयू बेड आणि २०० ऑक्सिजनयुक्त बेड असणार आहे. त्या दृष्टीने से प्रशासनाकडून युद्ध पातळीवर तयारी करण्यात येत आहे. रूग्णालयासाठी लागणारे बेड व गाद्या सोमवारी (दि. २७) आणण्यात आले आहेत. बेडनुसार सध्या विद्युत पुरवठा जोडणीचे काम सुरू आहे. पंखे, प्रकाश व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जात आहे. त्यानंतर वैद्यकीय रचनेनुसार ऑक्सिजन लाइनचे काम केले जाणार आहे. येत्या १५ दिवसांत हे रूग्णालय पूर्णपणे तयार करण्याचे नियोजन आहे, असे सहायक आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी सांगितले.


















