न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३०. जुलै. २०२०) :- शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांच्या वाकड, ताथवडे, पुनावळे प्रभाग क्रमांक २५ मधील विविध रस्ते व शाळेच्या विषयाला भाजपच्या सदस्यांनी विरोध करीत ते विषय १५ दिवस लांबणीवर टाकण्याची मागणी करीत सदस्यांनी बुधवारी स्थायी सभा तहकूब केली. तर, निव्वळ राजकीय द्वेषापोटी भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे समर्थक सदस्य विरोध करीत आहेत, असा आरोप शिवसेनेचे राहुल कलाटे यांनी केला आहे.
स्थायीच्या विषयपत्रिकेवर ताथवडेतील जीवनगरकडून मुंबई बेंगलोर महामार्गाकडे जाणारा २४ मीटर रूंदीचा रस्ता विकसित करणे, वाकडमधील आरक्षण क्रमांक ४/३३ मध्ये शाळा इमारत बांधणे, ताथवडे येथील शनि मंदिराकडून मारूंजी गावाकडे जाणारा ३० मीटर रूंदीचा डीपी रस्ता विकसित करणे, प्रभाग २५ मधील रस्ते काँक्रिटचे करणे हे प्रस्ताव होते. या सर्व कामांचा खर्च सुमारे ९२ कोटी आहे.
करोनाच्या काळात या कामांना ३३ टक्के खर्चातून मंजुरी देता येते का, या कामाची निविदा प्रक्रिया कशी राबविली. त्यात किती ठेकेदार सहभागी झाले. एकाच प्रभागात इतकी कामे कशी निघाली, असे विविध प्रश्न उपस्थित करीत त्यांची सविस्तर माहिती उपलब्ध करून द्या. तोपर्यंत ते ४ विषय पुढील १५ दिवस तहकूब ठेवावेत, अशी मागणी समितीचे भाजपचे सदस्य शशिकांत कदम, अभिषेक बारण, संतोष कांबळे, अंबरनाथ कांबळे, झामाबाई बारणे, आरती चौधे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली. त्यामुळे सभा अध्यक्ष संतोष लोंढे यांनी सभाच तहकूब केली.
प्रभाग १५ मधील या कामांची निविदा प्रक्रिया ११ फेब्रुवारी ते १६ मार्च या कालावधीत राबविली गेली आहे. नागरिकांची तसेच, हाऊसिंग सोसायट्यांनी मागणी केल्याने रस्ते व शाळेचे काम करण्यास आयुक्तांनी परवानगी दिली. आयुक्तांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी केली आहे. त्यांच्याकडूनच हे विषय मंजुरीसाठी समितीसमोर आले होते. केवळ राजकीय सूडबुद्धीने भाजपच्या सदस्यांनी त्याला विरोध केला आहे.
– राहुल कलाटे (शिवसेना गटनेता, स्थानिक नगरसेवक)…