न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३०. जुलै. २०२०) :- अण्णा भाऊ साठे यांची जंयती १ ऑगस्ट रोजी आहे. यावर्षी त्यांची १०० वी जयंती आहे. पिंपरी चिंचवड महापालिका आणि अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या संयुक्त विद्यमाने जन्मशताब्दी ऑनलाइन पद्धतीने साजरी करण्यात येणार आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत अण्णा भाऊ साठे यांचे कार्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी वेबिनार घेण्यात येणार आहे, अशी माहिती सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी महापौर माई ढोरे, उपमहापौरतुषार हिंगे, स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, अण्णा भाऊ साठे जंयती महोत्सवाचे अध्यक्ष दत्ता चव्हाण, कार्याध्यक्ष नितीन घोलप, खजिनदार शिवाजी साळवे उपस्थित होते.
नामदेव ढाके म्हणाले, यावर्षी शहरावर करोनाचे सावट आहे. त्यामुळे १ ते ५ ऑगस्ट या कालावधीमध्ये जयंती महोत्सव वेबिनारच्या माध्यमातून साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटनही ऑनलाइन केले जाणार आहे. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, आण्णा बनसोडे, महापौर, सर्व पक्षाचे गटनेते उपस्थित राहणार आहेत. पाच दिवस विविध कार्यक्रम घेतले जाणार आहे. त्यांचे चित्रीकरण लाइव्ह स्वरुपात नागरिकांना बघायला मिळणार आहे. त्याच्या लिंक नागरिकांपर्यंत पोहचविल्या जाणार आहेत. शंभर कार्यकर्ते रक्तदान करणार आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत एकावेळी फक्त पाच जणांना रक्तदान करता येणार आहे. तसेच कार्यकर्ते शंभर झाडांची लागवड करून त्यांचे संगोपन करणार आहे. अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याची माहिती देणारे संकेतस्थळ कार्यान्वित केले आहे.