- मनसे शहराध्यक्षाकडूनही अजित पवारांना त्याच भाषेत उत्तर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७. ऑगस्ट. २०२०) :- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौ-यावेळी त्यांच्याशी बोलण्यास जाणाऱ्या मनसेच्या गटनेत्याला पवारांनी चांगलेच सुनावले. आमचे चार मंत्री कोरोनाबाधित झाले आहेत. लांबणं बोल, फिजिकल डिस्टन्स ठेव, अशा शब्दांत नगरसेवक सचिन चिखले यांना पवारांनी सांगितले. यावर चिखले यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
अण्णासाहेब मगर स्टेडिअम येथील कोवीड केअर सेंटरची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते. त्यावेळी अधिकारी, नगरसेवक आणि पदाधिकारी यांची गर्दी झाल्याने फिजिकल डिस्टन्सचा फज्जा उडाला होता. तर पोलिसही मोठ्या प्रमाणावर होते. पिंपरी चिंचवड महापालिकेने पालिकेतील गटनेत्यांनाही बोलावले होते. त्यावेळी काही नगरसेवक फिजिकल डिस्टन्सचे उल्लंघन करीत जवळ येऊन बोलण्याचा प्रयत्न करीत होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना, मनसेचे नगरसेवक पवार यांच्या जवळ येऊन बोलत होते.
मनसेचे गटनेते सचिन चिखले हे पवार यांच्याशी जवळ जाऊन बोलण्याचा प्रयत्न करीत असताना अजित पवारांनी त्यांना थांबविले. फिजिकल डिस्टन्स ठेवा, लांबून बोला. आमचे चार मंत्रीही पॉझिटिव्ह आले आहेत, अशा शब्दांत पवारांनी सुनावले.
अजित पवारांना एवढीच जर काळजी होती तर त्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांचा लवाजमा बोलवायचा कशाला. ऐकूनच घ्यायचे नव्हते तर बोलावले कशाला? प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराची माहिती देण्यासाठी, कोरोनाबाधितांना ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसल्याची माहिती देण्यासाठी मी बोलत होतो. मात्र, पवारांनी एकेरी उल्लेख करत अपमानास्पद वागणूक दिली.
– सचिन चिखले (मनसे शहराध्यक्ष तथा मनसे गटनेता)…