अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन; शिवकार्य प्रतिष्ठानचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४. ऑगस्ट. २०२०) :- छत्रपती संभाजी बिडी या बिडी उत्पादनाचे नाव बदलून संबंधित कंपनी मालकावर कारवाई करण्याची मागणी पिंपरी-चिंचवड शिवकार्य प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास दि. १ सप्टेंबरपासून राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज हे अखंड महाराष्ट्राचे आद्य पुरुष असून, त्यांची ख्याती जगविख्यात आहे. अशा प्रेरणादायी कारकिर्दीच्या महामानवाचे बिडी उत्पादनास नाव देऊन बिडी कंपनी महाराष्ट्रातील युवकांना आकर्षित करून आपला व्यवसाय वाढवत आहेत.
या कंपनीने बहुजनांचे आराध्य दैवत छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान केला आहे. राज्यातील बहुजनांच्या भावना दुखावल्या गेल्या असून, कंपनी मालकावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड शिवकार्य प्रतिष्ठान, शिवधर्म फाउंडेशन, गडप्रेमी दिनेश ढगे, ऋशिकेश भणगे यांच्या वतीने करण्यात आली आहे.














