न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. ऑगस्ट. २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्थेची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पध्दतीने मंगळवारी (दि. १८ ऑगस्ट) संस्थेच्या पिंपरी स्टेशन कार्यालयात संपन्न झाली. या सभेत सर्वानुमते मंजूर झालेल्या ठरावानुसार संस्थेच्या सभासदांना सन. २०१९ – २० साठी तेरा टक्के लाभांश जाहिर करण्यात आला.
सभासदांच्या बँक खात्यावर शुक्रवार (दि. २१ ऑगस्ट) पर्यंत लाभांश जमा करण्यात येणार आहे. अध्यक्षा सीमा सुकाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेस मार्गदर्शक शशीकांत उर्फ बबन झिंजूर्डे, संस्थेचे उपाध्यक्ष दत्तात्रय ढगे, सचिव मुकूंद वाखारे, खजिनदार महादेव बोत्रे, संचालक आबा गोरे, मनोज माछरे, महाद्रंग वाघेरे, संजय कुटे, अंबर चिंचवडे, चारुशिला जोशी, राजाराम चिंचवडे, संदीश गव्हाणे, भगवान मोरे, दिलीप गुंजाळ, नथा मातेरे, रमेश चोरघे, यशवंत देसाई, स्विकृत सदस्य नंदकुमार घुले, व्यवस्थापक नंदकुमार कोंढाळकर आदींसह अनेक सभासदांनी सहभाग घेतला.
४९३३ सभासद संख्या व ऑडीट वर्ग ‘अ’ असणा-या तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी पंतसंस्था फेडरेशनच्या ‘दिपस्तंभ’ पुरस्काराने गौरविलेल्या या पंतसंस्थेने मागील वर्षीपेक्षा एक टक्का जादा लाभांश दिला आहे. सेवानिवृत्त सभासद व सलग पंचवीस वर्ष सभासद असणा-यांना गौरव निधी म्हणून अडीच हजार रुपये देण्यात येत होते. यामध्ये दुप्पट वाढ करुन चालू वर्षी पाच हजार रुपये गौरव निधी देण्यात येणार आहे. दरवर्षी वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्था सभासदांच्या गुणवंत पाल्यांना आवश्यक वस्तू भेट देऊन गौरविते. या वर्षी प्रथमच अशा गुणवंत विद्यार्थ्यांना पाचशे रुपये भेट देऊन गौरविण्यात येणार आहे. सभासद मयत झाल्यास त्यांच्या अंत्यविधीसाठी पाच हजार रुपये देण्यात येत होते. त्यामध्ये आता दुप्पट वाढ करुन दहा हजार रुपये देण्यात येणार आहे. अशी माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या वतीने प्रसिध्दीस देण्यात आली आहे.