न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २०. ऑगस्ट. २०२०) :- कोरोना महामारीच्या संकट काळात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भांडार व शिक्षण विभागाकडून थेट पद्धतीने अवाच्या सव्वा दराने खरेदी करून पालिकेची लूट केली जात आहे. पालिकेच्या शाळा बंद असताना शालेय साहित्य खरेदीसाठी २ कोटी ४३ लाखांचा साहित्य खरेदीचा ठराव केला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीची बुधवारी तहकूब झालेली सभा आज (गुरुवारी) पार पडली. या सभेत राष्ट्रवादीच्या मयूर कलाटे यांनी महापालिका आयुक्त यांना चुकीच्या कामामुळे चांगलेच फटकारले व जाहीर दिलगिरी व्यक्त करण्यास भाग पाडले.
सभेच्या विषयपत्रिकेवर मागील आदेशान्वये चित्रकला, प्रयोग, नकाशा वही, विविध अभ्यासपुरक पुस्तके १ कोटी ११ लाख ८० हजार ७१५ आणि १ कोटी ३१ लाख ४१ हजार ७१० रुपयांच्या वह्या असे २ कोटी ४३ लाख रुपयांच्या शालेय साहित्य खरेदीचा प्रस्ताव होता. त्याला राष्ट्रवादीचे सदस्य मयूर कलाटे यांनी आक्षेप घेत आयुक्तांना खुलासा देण्याची मागणी केली.
२०१६ मध्ये शालेय साहित्य खरेदीची निविदा २०१६-१७, २०१७-१८ साठी प्रसिद्ध केली होती. पुरवठाधारकांसोबतचे करारनामे २०१८-१९ पर्यंतच मर्यादित होते. मागील वर्षी २०१९ मध्ये प्रशासनाने हे करारनामे रद्द करून पुन्हा २०१९-२० साठी पुरवठाधारकांसोबत नव्याने एक वर्षाचा करारनामा केला.
त्यामुळे जुन्याच पुरवठादारांकडून आणि जुन्याच दराने, आदेशान्वये शालेय साहित्य खरेदी कशी आणि कोणासाठी?, असा सवाल कलाटे यांनी उपस्थित केला. प्रशासनाने नियमबाह्य पद्धतीने हा विषय स्थायी समोर आणला. याच्या खुलाश्याची मागणी केली. अखेर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ‘दिलगिरी’ व्यक्त करत ‘पुर्नपत्ययी’ आदेशान्वयाचे शालेय साहित्य खरेदीचे तब्बल २ कोटी ४३ लाख रुपयांचे विषय मागे घेतले. आयुक्तांनी शालेय साहित्य खरेदीचे २० आणि २१ क्रमांकाचे विषय मागे घेण्याबाब स्थायी समिती अध्यक्षांना पत्र दिले.
संकटकाळातही पैसे कमावण्याची एकही संधी सत्ताधारी भाजप व पालिकेच्या भांडार विभागाकडून सोडली जात नाही. काही ठराविक ठेकेदारांना हाताशी धरून पालिकेची लूट करण्याचे काम स्थायी समिती व प्रशासनातील काही अधिकारी थेट पद्धतीने करीत आहेत, असा आरोपही कलाटे यांनी यावेळी केला.














