- महापौर व स्थायी समिती सभापतींकडून आयुक्तांच्या निर्णयाचा निषेध…!
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २०. ऑगस्ट. २०२०) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य खरेदीचा विषय आयुक्तांनीच मा. स्थायी समितीकडे मंजुरीसाठी पाठविलेला असतानाही त्यांनी हा विषय कोणाच्या दबावाखाली येत माघारी घेतला? ही घटना एका आयएएस अधिकाऱ्याच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी घेतलेल्या या निर्णयामुळे व त्यांच्या अशा भूमिकेमुळे महापालिकेत भाजप हा सत्ताधारी पक्ष असल्याने नाहक ही संशयाची सुई सत्ताधाऱ्यांकडे येत असुन भाजपला बदनाम करण्याचा डाव आयुक्तांकडुन सुरु असल्याचा संशय बळावत आहे. आयुक्तांच्या अशा भूमिकेचे व निर्णयाचे आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत असल्याचे महापालिकेच्या महापौर उषा उर्फ माई मनोहर ढोरे यांनी म्हटले आहे. याबबत त्यांनी प्रसिद्धीस पत्रक दिले आहे.
पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहाता शहरातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा शासनाच्या आदेशानुसार बंद आहेत. सर्व शाळा पुढील महिन्यात सुरु करण्याचे शासनाचे नियोजन आहे. तसेच शहरातील खाजगी शाळांनी विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले शालेय साहित्य व वह्या पुस्तकाची विक्री सुरु आहे. त्याचप्रमाणे शासनाने महापालिका शाळेतील विद्यार्थ्यासाठी पाठ्यपुस्तके पाठविली असुन त्याचे विद्यार्थ्यांना वाटप देखील करण्यात आले आहे.
शासनाने पुस्तके पाठविली मग विद्यार्थ्यांना वह्या व इतर साहित्य लागणार नाही का? त्यामुळे या शैक्षणिक वर्षात महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होवु नये म्हणून शालेय साहित्य खरेदी करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी महापालिकेच्या स्थायी समिती सभेच्या विषयपत्रिकेवर पुरवठादाराकडून मागील आदेशान्वये चित्रकला, प्रयोग, नकाशा वही, विविध अभ्यासपुरक पुस्तके १ कोटी ११ लाख ८० हजार ७१५ आणि १ कोटी ३१ लाख ४१ हजार ७१० रुपयांच्या वह्या असे २ कोटी ४३ लाख रुपयांचे शालेय साहित्य खरेदीचे प्रस्ताव प्रशासनाने मंजुरीसाठी ठेवले होते. त्यावर आज झालेल्या स्थायी समिती सभेमध्ये सदरचा प्रस्ताव मागे घेण्याची नामुष्की आयुक्तांवर आली आणि त्यांनी दिलगिरी व्यक्त करत ‘ पुर्नप्रत्ययी ‘ आदेशान्वयाचे शालेय साहित्य खरेदीचे तब्बल २ कोटी ४३ लाख रुपयांचे विषय मागे घेतले.
वास्तविक पाहता कोरोना पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थितीमध्ये महानगरपालिका अधिनियम कलम ६७ ( ३ ) नुसार तातडीची खरेदी करण्याचे अधिकार आयुक्तांना आहेत. या कलमानुसार आयुक्तांनी कोविड -१९ च्या अनुषंगाने माहे मार्च २०२० पासुन विविध अत्यावश्यक साहित्याची थेट पद्धतीने खरेदी केलेली आहे. खरे तर हा विषय महानगरपालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांशी निगडीत होता. या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य खरेदीचा हा विषय आयुक्तांनीच मा. स्थायी समितीकडे मंजुरीसाठी पाठविलेला असतानाही त्यांनी हा विषय कोणाच्या दबावाखाली येत माघारी घेतला हे कळत नसल्याचे दिसून येत आहे. हा विषय योग्य तो विचार विनिमय करुन प्रशासनाकडुनच मा. स्थायी समिती समोर आलेला असतानासुध्दा त्याला माघारी घेण्याची नामुष्की येणे हे एका आयएएस अधिकाऱ्याच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी घेतलेल्या या निर्णयामुळे व त्यांच्या अशा भूमिकेमुळे महापालिकेत भाजप हा सत्ताधारी पक्ष असल्याने नाहक ही संशयाची सुई सत्ताधाऱ्यांकडे येत असुन भाजपला बदनाम करण्याचा डाव आयुक्तांकडुन सुरु असल्याचा संशय बळावत आहे. आयुक्तांच्या अशा भूमिकेचे व निर्णयाचे आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहोत, असे या पत्रकात महापौर ढोरे यांनी म्हटले आहे.















