- भांडार विभागाच्या सहायक आयुक्तांची भूमिका संशयास्पद – सुलक्षणा शिलवंत धर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१. ऑगस्ट. २०२०) :- कोरोनाच्या नावाखाली साडेतीन कोटी रुपयांच्या साहित्याची खरेदी रद्द करण्याच्या भांडार विभागाच्या उद्योगा’ला दोन आठवड्यांसाठी ब्रेक लागला आहे. हा वादग्रस्त विषय दोन आठवड्यांसाठी तहकूब करण्याचा निर्णय स्थायी समितीने आज झालेल्या सभेत घेतला आहे. तर ही निविदाच तात्काळ रद्द करण्यात यावी यासाठी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे तक्रार केली आहे.
स्मिथ मेडिकल इंडिया या कंपनीचे Inspired 02 FLO – High Flow Nasal हि Oxygen Therapy Equipment या मशीनचे १३० नग थेट पद्धतीने कंपनीचे वितरक मे. ड्रग हाऊस पुणे यांच्याकडून घेण्याचा निर्णय भांडार विभागाने घेतला आहे. वस्तुतः या मशीनची बाजारामध्ये ९० हजार ते १ लाख १५ हजार इतकी किंमत असतानाही ठराविक ठेकेदार, वितरक आणि कंपनीच्या हितसंबंधातून महापालिकेकडून तब्बल साडेतीन कोटींची उधळपट्टी करण्याचा घाट घालण्यात आला होता. समितीच्या सभेत राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत यांच्यासह इतर काही सदस्यांनी विरोध केल्यानंतर हा विषय तहकूब करण्यात आला आहे.
याबाबत माहिती देताना शिलवंत म्हणाल्या, केवळ आर्थिक हितसंबंधातून ही खरेदी करण्यात आल्यामुळे आयुक्तांसमोर याबाबत अनेक मुद्दे उपस्थित केले. मात्र भांडार विभागाचे सहायक आयुक्त मंगेश चितळे हे आजच्या सभेला जाणीवपूर्वक गैरहजर राहिल्याने या निविदा प्रक्रियेतील त्यांची भूमिका आणखीनच संशयास्पद झाली आहे. या मशीनसह अनेक विषय भांडार विभागाने चुकीच्या पद्धतीने राबविले असून आयुक्तही मूक संम्मती देत असल्यामुळे नागरिकांच्या पैशांची लूट सुरू आहे. स्थायी समितीने हा विषय दोन आठवडे तहकूब ठेवला असला तरी हा विषय तात्काळ रद्द करावा तसेच रीतसर निविदा मागवून खरेदी करण्यात यावी, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केल्याचेही शिलवंत म्हणाल्या.















