- विसर्जन घाटांवरदेखील गणेशमुर्ती विसर्जन करण्यास मनाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१. ऑगस्ट. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणेबाबत निर्देश जारी करण्यात आलेले आहेत. तसेच नागरिकांची होणारी संभाव्य गर्दी टाळण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनादेखील आगमन व विसर्जन मिरवणूक काढण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे.
तसेच यावर्षी महानगरपालिकेमार्फत नैसर्गिक व सार्वजनिक ठिकाणी उभारण्यात येणा-या विसर्जन घाटांवर गणेशमुर्ती विसर्जन करण्यासदेखील मनाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे महानगरपालिकेमार्फत विसर्जन घाटांचे ठिकाणी कोणतीही सुविधा याकामी उपलब्ध करण्यात येणार नसल्याने नागरिकांनी गणेशमुर्तींचे विसर्जन घरामध्येच करावयाचे आहे.
महानगरपालिकेमार्फत विसर्जन घाटांचे परिसरामध्ये करण्यात येत असलेली साफसफाई ही आरोग्य विभागाच्या नियमित कामकाजाचा भाग असून त्याठिकाणी कोणतीही विसर्जनाची परवानगी देण्यात आलेली नाही याचीही नागरिकांनी नोंद घ्यावी. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिकेमार्फत गणेशोत्सवानिमित्त करण्यात आलेल्या प्रतिबंधानुसार साधेपणाने गणेशमूर्तींचे आगमन व विसर्जन पार पाडून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेकडून सर्व नागरिकांना करण्यात आले आहे.















