न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२. ऑगस्ट २०२०) :- रस्त्यावरून घरी निघालेल्या एका मुलीला कोयत्याचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार करणाऱ्यास तळेगाव दाभाडे पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या. आरोपीला ट्रकसह जळगावमधील मुक्ताईनगर येथून अटक करण्यात आली आहे.
करमवीर गुलाब जैसवार (वय ३०, रा. मानकोली फाटा, दिवेगाव, भिवंडी, ठाणे) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याला पुढील कारवाईसाठी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली होती. पीडित मुलगी मुंबई – पुणे एक्स्प्रेस हायवेवरील गहुंजे गावाच्या नजीक असणाऱ्या पुलावरून घरी एकटीच चालली असल्याचे आरोपीने पाहिले. याप्रसंगी त्याने पीडित मुलीला कोयत्याचा धाक दाखवून तिचे कपडे फाडून बलात्कार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर गावात चिंतेचे वातावरण होते. आरोपीला तत्काळ अटक करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू होते. घटनेनंतर आरोपी पसार झाला. आरोपी करमवीरला मुक्ताईनगर येथून अटक करण्यात आली.















