न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२. ऑगस्ट २०२०) :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्रदिनाचे औचित्य साधून देशवासियांकरीता “नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन” हा महत्वाकांक्षी प्रकल्प राबविणेबाबत घोषणा केलेली आहे. सदरचा प्रकल्प हा केंद्रशासनाचा “राष्ट्रीय डिजिटल हेल्थ” प्रकल्पाचा महत्वाचा भाग असून त्याद्वारे भारतीयांच्या आरोग्य विषयक सेवांमध्ये अमुलाग्र बदल होणार आहे. सदर प्रकल्पामुळे नागरिकांचे आरोग्य विषयक डेटाबेस तयार होणार असून त्याचा उपयोग करून माहितीचे पृथ्थकरण करणे सोईस्कर होणार असून त्याचा उपयोग करून वैद्यकीय क्षेत्रास विविध संशोधण करणे शक्य होणार आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालय येथे या पुर्वीच म्हणजे सन २०११ साली मे. अमृता टेक्नॉलॉजीज् यांच्या सहकार्याने तत्कालीन महापालिका आयुक्त आशिष शर्मा यांनी वाय.सी.एम. रूग्णालयामध्ये येणा-या नागरिकांची सर्व माहिती डिजिटल स्वरूपात जतन व्हावी या दृष्टीने “ई- हेल्थकार्ड” प्रणालीचा अवलंब केलेला आहे. या प्रणालीचे उद्घाटन तत्कालीन व सध्याचे उपमुख्यमंत्री, अजितदादा पवार यांचे हस्ते करून सदरची प्रणाली कार्यान्वित करणेत आलेली आहे. सदरची प्रणाली सन २०११ पासून ते आज अखेर यशस्वीरित्या कार्यान्वित आहे. सदर प्रणालीची उपयोगिता व आवश्यकता याचा विचार करून महानगरपालिकेस प्राप्त झालेल्या आजपर्यंतच्या सर्वच आयुक्तांनी सदर प्रणाली कार्यान्वित राहील याबाबत दक्षता घेतलेली आहे.
या प्रणालीद्वारे महानगरपालिकेच्या वाय.सी.एम. रूग्णालयामध्ये पिंपरी चिंचवड शहरातीलच नव्हे तर संपुर्ण पुणे जिल्ह्यातील विविध भागांमधून उपचारासाठी येणा-या बाह्य रूग्णांचे रेकॉर्ड हे “ई- हेल्थकार्ड” प्रणालीद्वारे डिजिटल स्वरूपात जतन करणेत आलेले आहे. वाय.सी.एम. रूग्णालयात बाह्यरूग्ण विभागामध्ये उपचारासाठी येणा-या रूग्णांना केस पेपर ऐवजी महापालिकेमार्फत हेल्थकार्ड उपलब्ध करून देणेत येत असून रूग्ण उपचारांकरीता वैद्यकीय अधिका-यांकडे गेल्यानंतर त्याच्या आजारा विषयीची सर्व माहिती हेल्थकार्ड प्रणालीमध्ये समाविष्ठ करणेत येते. तसेच डॉक्टरांनी दिलेली औषधे इत्यादी बाबतची माहिती देखील प्रणालीमध्ये समाविष्ठ करणेत येते. सुविधेमुळे रूग्णास कोणतीही कागदपत्र आपल्या जवळ जतन करावी लागत नाहीत व वैद्यकीय अधिका-यांना सदर रूग्णाची माहिती एका क्लिकद्वारे उपलब्ध होत आहे.
वाय.सी.एम. रूग्णालयाकडे येणा-या रूग्णांची संख्या विचारात घेता सदर प्रणालीमुळे रूग्णांची तपासणी व उपचार यामध्ये मोठ्या प्रमाणात वेळेची बचत झालेली असून जास्तीत जास्त रूग्णांची बाह्यरूग्ण विभागामध्ये तपासणी करून उपचार करणे शक्य झालेले आहे. वैद्यकीय अधिका-यांनी सुचविलेल्या विविध तपासण्या, चाचण्या इत्यादीची माहितीही सदर प्रणालीमध्ये समाविष्ठ करणेत येत आहे. यामध्ये रक्ताचे अहवाल, एक्स-रे, सोनोग्राफी, सी.टी. स्कँन, एम.आर.आय. इत्यादी बाबींचा समावेश आहे. लॅबोरेटरी व विविध रेडिओलॉजी उपकरणांसोबत “ई- हेल्थकार्ड” प्रणालीचे इंटिग्रेशन करणेत आलेले असून त्यामुळे रूग्णांचे तपासणीचे अचुक अहवाल प्रणालीद्वारे वैद्यकीय अधिका-यांना तात्काळ प्राप्त होत असून अचुक निदान व तत्काळ वैद्यकीय उपचार करणे सोपे झालेले आहे.
तसेच रूग्णांच्या वेळेचीही बचत होत आहे. तसेच रूग्णालयातील अधिकारी व कर्मचा-यांच्या कार्यपध्दतीमध्ये देखील सदर प्रणालीद्वारे सुलभता निर्माण झालेली आहे. सद्यस्थितीत अमृता टेक्नॉलॉजीजच्या समन्वयाने रूग्णालयातील अंतरूग्ण विभागाअंतर्गत उपचार घेणा-या रूग्णांची माहिती “ई- हेल्थकार्ड” प्रणालीमध्ये समाविष्ठ करण्याची सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदर प्रणालीद्वारे संबंधित रूग्णांना डॅशबोर्ड सुविधेद्वारे त्यांची आरोग्य विषयक माहिती घरबसल्या कधीही पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहे. तसेच संबंधित रूग्णांना रूग्णालयामध्ये उपचारासाठी अथवा पुन:तपासणीसाठी येणे करीता ई-मेलद्वारे अथवा एस.एम.एस. द्वारे अवगत करण्याची सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहे.
उपरोक्त प्रमाणे सद्यस्थिती वाय,सी.एम. रूग्णालयामध्ये बाह्यरूग्ण विभागामध्ये येणा-या रूग्णांची डिजिलट स्वरूपात माहिती महानगरपालिकेकडे
उपलब्ध झालेली असून सदर माहितीचा उपयोग महानगरपालिकेस वैद्यकीय विषयक विविध योजना राबविणेसाठी होत आहे. सदर “ई- हेल्थकार्ड” प्रणाली वाय.सी.एम. रूग्णालया बरोबरच टप्प्या टप्याने मनपाच्या इतर रूग्णालयांमध्ये राबविणेबाबत महानगरपालिकेचा विचार असून काही निवडक रूग्णालयांमध्ये सदरची सुविधा उपलब्ध करणेत आलेली आहे. सदरचा प्रकल्प यशस्वीपणे राबविणेकरीता वाय.सी.एम. रूग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी/कर्मचारी, वैद्यकीय विभाग व माहिती व तंत्रज्ञान विभागाचे मोलाचे सहकार्य लाभलेले आहे, अशी पिंपरी चिंचवड पालिकेचे माहिती व तंत्रज्ञान
विभागाचे मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांनी दिली.















