न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२. ऑगस्ट २०२०) :- फिर्यादीचा मुलगा व आरोपी यांच्यात काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्याचा राग आरोपी यांच्या मनात होता. रात्री तो हनुमान मंदिरासमोर झोपला असता रात्री सव्वाबाराच्या सुमारास आरोपी तेथे आले. झोपेत असलेल्या तरुणावर धारदार शस्त्राने वार केले. तसेच दगडी पाटा डोक्यात मारला. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला पिंपरीतील महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान शनिवारी त्याचा मृत्यू झाला. हल्ला केल्यानंतर आरोपी यांनी तेथील दोन वाहनांची तोडफोड केली. घटनेनंतर आरोपी तेथून पळून गेले.
विद्यानगर, चिंचवड येथील हनुमान मंदिरासमोर शनिवारी (दि. २२) रोजी ही घटना घडली. शंकर गोविंद सुतार (वय २३, रा. हनुमान मंदिरासमोर, विद्यानगर, चिंचवड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी संतोष चौगुले (वय २५), अजय कांबळे (वय २३), मोसीन शेख (वय २५), पप्पू पवार (वय २८, सर्वाचे पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी नीला गोविंद सुतार (वय ४५) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.















