- चिंचवडगावातील घाट परिसर प्रशासनाकडून सील….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४. ऑगस्ट. २०२०) :- ‘गणपती बाप्पा मोरया या.. पुढच्या वर्षी लवकर या’ जयघोषांसह राज्यभरासह पिंपरी-चिंचवड शहरातील ठिकठिकाणी दीड दिवसाच्या गणपती बाप्पाचे साधेपणाने विसर्जन करण्यात आले. शनिवारी (दि. २२) मोठ्या आनंदाने व उत्साहात गणरायाचे घरोघरी आगमन झाले होते. मात्र, अनेकांच्या घरी परंपरेनुसार दीड दिवसातच बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. दरम्यान चिंचवडगावातील पवना नदीवरील घाट परिसर प्रशासनाने सील केला आहे. त्यामुळे गणेशभक्तांना त्या ठिकाणी गणेश मूर्ती विसर्जन करता येणार नाही. त्यामुळे त्यांचा हिरमोड झाला.
कोरोनामुळे गणेश मूर्तींचे नदीत विसर्जन करण्यावर बंदी घातल्याने गणेश मूर्ती दान करण्यावर यावर्षी भर देण्यात आला आहे. स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी कृत्रिम हौद तयार करण्यात आले असून, गणेश मूर्तीचे विसर्जन करून नंतर मूर्ती स्वयंसेवी संस्थेकडे जमा केली जात आहे. दुपारी तीन नंतर सहकुटुंब विसर्जनाला सुरुवात झाली. यावेळी कुटुंबियांनी बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला.
गणरायांची शनिवारी म्हणजे चतुर्थीच्या मुहूर्तावर स्थापना करण्यात आली होती. परवा रात्री काल दुपारपर्यंत असा दीड दिवस पकडला जातो. त्यानुसार रविवारी दुपारी तीननंतर अनेकांनी विसर्जनाची तयारी केली. त्यानंतर विधिवत पूजा, आरती करून व नैवेद्य दाखवून ढोल ताशाच्या गजराविना गणेशाची मूर्ती दान करून, लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला.















