- पुणे जिल्ह्यातील दोन महत्वपूर्ण ऐतिहासिक गणेशपीठे – विजय पाटील…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४. ऑगस्ट. २०२०) :- भाद्रपद महिन्याच्या चतुर्थीला देशात नव्हे तर विदेशातही गणेशदेवाचा मोठा जन्मोत्सव साजरा केला जातो. कोरोना काळातही गणेश उत्सव घरोघरी साजरा होत आहे. गणेशाचे आगमन मोठ्या भक्तिभावाने झालेले आहे. आपल्या शहराला म्हणजेच पिंपरी चिंचवड शहराला गणेशाचा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. इसवी सन १६५७ मध्ये महान साधू मोरया गोसावींनी जिवंत समाधी याच ठिकाणी घेतलेली आहे. त्यांचे थोरले चिरंजीव चिंतामणी महाराजांनी समाधी स्थानी सन १६५९ मध्ये रिद्धी सिद्धी सहित मोरया गणेशाची स्थापना केली. आज चिंचवडचे मोरया मंदिर जगप्रसिद्ध झाले आहे. ‘गाणपत्य’ संप्रदायासाठी चिंचवड मोरया मंदिर मोठे श्रद्धास्थान आहे.
चिंचवड येथील मोरया गणेश प्रमाणेच यवत – भुलेश्वर येथील स्त्री रूपातील गणेश देशातील मोजक्याच स्त्री रूपातील गणेश मूर्तींपैकी एक आहे.राजस्थान येथील रायगड,मध्यप्रदेश मधील भेडाघाट योगिनी मंदिर ,केरळ चेरीयाना मधील लाकडी स्त्री गणेश,तामिळनाडूतील चिदंबरंम मंदिर,ओडिसा येथील राणीपुर सरियाल,बिहार मधील मगध येथे स्त्री रूपातील गणेशाची मूर्ती आढळते. देशात ८ ठिकाणीच स्त्री रूपातील गणेशमूर्ती अद्यापपर्यंत आढळून आलेल्या आहेत.त्यातील महाराष्ट्र राज्यात पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील यवत येथील दौलतमंगळ टेकडीवर स्थित असलेल्या भुलेश्वर महादेव देवालयात सदरची स्त्री वेशातील मूर्ती आढळते. सदरचे मंदिर ‘शाक्त’ संप्रदायांसाठी श्रध्दापीठ आहे.
इतिहासात डोकावले असता गुप्त वंश काळातच म्हणजेच तिसऱ्या शतकापासून विनायकी स्वरूपातील स्त्री गणेशाची म्हणजेच शक्तीची आराधना सुरू झाल्याचे आढळते,राजस्थानात तर २१०० वर्ष जुनी टेराकोटाची स्त्री गणेश मुर्ती आढळून आलेली आहे, त्यानंतर बिहार मगध येथे १० व्या शतकातील गणेशनी मूर्ती आहे. पुण्यातील यवत येथील विनायकी मूर्ती १३ व्या शतकातील यादवकालीन निर्मित मूर्ती आहे.म्हणजेच काय तर दहाव्या शतकापासून १५ व्या शतकापर्यंत कर्नाटक ,गोवा व महाराष्ट्र परिसरात गाणपत्य व शाक्त संप्रदाय चरमसीमेवर होता.१५ व्या शतकात ‘गाणपत्य’उपासक वामनभट (शाळीग्राम)व पार्वतीबाई यांचे कुटुंब कर्नाटकातून मोरगाव येथे आले. त्यांचे चिरंजीव महान साधू मोरया गोसावी हे चिंचवडमध्ये स्थायिक झाले.१६५७ मध्ये मोरया गोसावींनी जिवंत समाधी घेतली. पुढे त्यांचे थोरले चिरंजीव चिंतामणी महाराजाना संत तुकाराम महाराजांनी देव म्हणून संबोधले.अश्या पद्धतीने चिंचवड येथे गाणपत्य श्रद्धापीठ उदयास आले. अश्या मोरया स्थानापासून साधारण ६८ की मी अंतरावर पुणे सोलापूर रोडवरील पुरंदर येथील यवत भुलेश्वर मंदिरात विनायकी ह्या स्त्री रूपातील गणेशाचे दर्शन होते.
इसवी सन १२६० मध्ये यादव कुळातील कृष्णदेव यांचा मृत्यू झाल्यानंतर १२९० पर्यंत महादेव आणि रामचंद्र देव यांच्या काळात अध्यात्मिक हिंदूशिल्पे व कलाकुसर हिंदूमंदिरांची रचना मोठया प्रमाणात महाराष्ट्रात झाली.बलसाणे, झोडगे,सिन्नर (नाशिक),यवत,पेढगाव,फलटण औढा नागनाथ,निलंगा,लोणार,सातगाव, देगाव, तहकारी येथे हेमाडपंथी मंदिरे उभारण्यात आली.हेमाद्री म्हणजेच हेमाडपंत हे यादव दरबारी प्रमुख मंत्री होते. त्याच्या कार्यकाळात मंदिरे उभारली गेली(१२६० ते १२९० या कालखंडात) सदर मंदीरांचे दगडी बांधकाम चुना विरहित असल्याकारणाने त्यांना हेमाडपंथी संबोधले जाते.भुलेश्वर मंदिरामध्ये रामायण महाभारतातील प्रसंग अतिशय कलाकुसरीने कोरलेले आहे.परंतु स्त्री स्वरूपातील देवतानसाठीचे सदरचे प्राचीन मंदिर अभ्यासकांना त्या ठिकाणी खेचून आणते.
धर्मोक्त पुरणात स्त्री रूपातील विनायकीचे वर्णन आढळते.पार्वती मातेच्या आवाहनामुळे’अंधक’ राक्षसाचा संहार करण्यासाठी गणपतीने स्त्री रूप धारण केले. अन्य स्त्री देवतांसंमवेत गणेशाने अंधक राक्षसाचे रक्त धरतीवर पडू न देता पिऊन टाकले.त्यामुळे अंधक राक्षसाचा संहार होऊ शकला. अश्या पद्धतीने उच्चीष्ट स्त्री गणेशाचे विनायकी रूप प्रगट झाले, सदरच्या रुपात शिर हत्तीस्वरूप व शरीर पार्वती स्वरूप चतुर्भुज असल्याकारणाने शाक्त संप्रदायातील भक्तगण या स्वरूपाची पूजा करतात.मूर्ती कालस्वरूप व उग्र स्वरूपातील असल्या कारणाने ह्या मूर्तीची तांत्रिक उपासनाही केली जाते.
वनदुर्गा उपनिषद, देवी भागवत पुराण, काशीखंड,मार्कंडेय पुराण(दुर्गा सप्तशती),धर्मोक्त पुराण यामध्ये स्त्री रूपातील गणेशास गजाननी,गजरूपा, गणेशी,गजनंदी,लंबोदरी,रिद्धी,पितांबरी, विघ्नेश्वरि असे संबोधले गेले आहे. देवी सहस्र नामातही लंबोदरी स्वरूपाचे नाव आहे.भुलेश्वर मंदिरातील स्त्री गणेश पद्मासनात विराजमान असून एका हातात परशु (कुऱ्हाड)व एक हातात पाश असून अन्य दोन हातात मोदक व दंत आहे. म्हणजेच गणेशाचे हे स्वरूप संयम,नियंत्रण,दंड प्रतीक,आनंदाची अनुभूती याचे दर्शन देते.अश्या पद्धतीने पुणे जिल्ह्यातील चिंचवड चा मोरया ‘गाणपत्य’ संप्रदायासाठी व भुलेश्वर येथील विनायकी स्त्री गणेश हा ‘शाक्त’ संप्रदायासाठी नक्कीच श्रद्धास्थानी आहे. सदरचा गणपती विशेष लेख गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष व प्राचीन गणपती मंदिर अभ्यासक विजय पाटील यांनी लिहिलेला आहे.















