- ग्रेड सेपरेटरच्या उदघाटनास हजेरी; आमदारांसह नगरसेवकांमध्ये घबराट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७. ऑगस्ट. २०२०) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांना करोनाचा संसर्ग झाल्याचे गुरूवारी उघड झाले. भाजपा आमदार लक्ष्मण जगताप, महापौर उषा उर्फ माई ढोरे, सत्तारूढ पक्षाचे नेते नामदेव ढाके यांनी आज सकाळी जगताप डेअरी येथील ग्रेड सेपरेटरच्या उदघाटनाप्रसंगी एकत्र हजेरी लावली होती. त्यावेळी विरोधी पक्ष नेते काटे हे देखील उपस्थित होते.
त्यामुळे आता आमदार, महापौर, सत्तारूढ पक्षांचे नेते यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यावरदेखील क्वारंटाइन होण्याची वेळ येते की काय हे पाहावे लागणार आहे.
पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेचे विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांचा गुरूवारी दुपारी करोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यांच्यावर पुण्यातील नामांकित रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुधवारी त्यांनी करोना टेस्ट केली होती. त्याचा अहवाल आज दुपारी प्राप्त झाला. त्यात ते पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. काटे यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली आहे.


















