न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८. ऑगस्ट. २०२०) :- राज्यात आरोग्यविषयक विविध योजना आणि कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात महत्त्वाचा सहभाग असलेल्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्यासाठी ४५ हजार ७८३ स्मार्ट मोबाईल फोन खरेदी करण्याचा निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे. त्यासाठी लागणाऱ्या ३६ कोटी ६२ लाख ६४ हजार रुपये इतक्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध योजना राबविल्या जातात. ग्रामीण भागात आशा कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांची अंमलबजावणी केली जाते. त्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने एक सॉफ्टवेअर तयार केले आहे. त्यातून आरोग्यविषयक कार्यक्रमांच्या अंमलबजावणीची अद्ययावत माहिती उपलब्ध होणार आहे. त्यात आवश्यकतेनुसार योग्य त्या उपाययोजना करणे शक्य होणार आहे. याचाच एक भाग म्हणून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांसाठी स्मार्ट मोबाइल फोन खरेदी करण्यात येणार आहे.
प्रतिफोन ८ हजार रुपये या दराने ही फोन खरेदी करण्यात येणार आहेत. ही संपूर्ण खरेदी निविदा प्रक्रियेद्वारे करणे बंधनकारक राहणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने गुरुवारी तसा शासन आदेश जारी केला आहे.


















