- काम तात्काळ मार्गी लावा; उपमुख्यमंत्र्यांचे आयुक्तांना आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० ऑगस्ट २०२०) :- पिंपरी (मोरवाडी) कोर्टाचे नेहरूनगर स्टेडियम समोरील सर्व्हे न. १०९/११०, सिटी स.न.६३६५/६६/६७,६३७०,६३७२ मधील पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे इमारतीमध्ये लवकरात लवकर स्थलांतर होणे कामी तसेच मोशी येथील सेक्टर १४ मध्ये नियोजित पिंपरी चिंचवड शहर परिसरासाठी अद्ययावत न्यायालयीन संकुलाचे लवकरात लवकर बांधकाम सुरू होणे कामी आज पिंपरी चिंचवड ॲड. बार असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष ॲड. दिनकर बारणे, माजी अध्यक्ष ॲड. संजय दातिर पाटील, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड. गोवा चे शिस्तपालन समितीचे मा. सदस्य ॲड. अतिश लांडगे, सचिव ॲड. हर्षद नढे पाटील, खजिनदार ॲड. सागर अडागळे इ. वकिलांचे शिष्टमंडळाने पिंपरीचे आमदार आण्णा बनसोडे यांचे समवेत पुण्याचे पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची ऑटो क्लस्टर, पिंपरी येथे भेट घेतली.
भेटीमध्ये नेहरूनगर येथील इमारतीमध्ये कोर्ट कामासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने फर्निचरचे काम लवकर सुरू करून सदर इमारतीमध्ये पिंपरी कोर्टाचे लवकरात लवकर स्थलांतर करणेकामी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अध्यक्ष ॲड. दिनकर बारणे यांनी निवेदन देऊन म्हणणे मांडले. आमदार अण्णा बनसोडे यांनी याबाबत प्रश्नाचे गांभीर्य सांगितले. त्यावर उपमुख्यमंत्री साहेबांनी तातडीने पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना नेहरूनगर इमारतीमध्ये कोर्ट कामासाठी फर्निचरचे काम लवकर सुरू करणेबाबतचे आदेश दिले. कोवीड – १९ चे परिस्थितीत पिंपरी कोर्टाचे अपुरे जागेत कामकाज करताना सोशल व फिजिकल अंतराची मर्यादा पाळणे कठीण झाले आहे. मागच्याच आठवड्यात न्यायमूर्ती एस.एस. शिंदे यांच्या सोबत नेहरूनगर येथील जागेच्या भाड्याच्या संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक झाली होती. बैठकीत बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा चे विद्यमान सदस्य ॲड. राजेंद्र उमाप व ॲड. विठ्ठल आबा कोंडे देशमुख यांनी पिंपरी बारची बाजू मा. न्यायमूर्तीयांच्या पुढे मांडली होती. मा. उच्च न्यायालय यांनी सदर इमारतीचे भाड्याच्या रकमेस मंजुरी दिली आहे.
मोशी येथील सेक्टर नंबर १४ मध्ये पिंपरी चिंचवड शहर परिसरासाठी नियोजित अद्ययावत कोर्टाचे व न्यायालयीन कर्मचारी निवास संकुलाचे इमारतीचे विकसन काम सुरू होणे कामी सुरुवातीला पन्नास लाखांचा निधी खात्यावर वर्ग करून लवकरात लवकर काम सुरू करणेबाबत दुसरे निवेदनही मा. उपमुख्यमंत्री साहेबांना देण्यात आले. त्यावर विधी व न्याय विभागाकडून तशी मागणी आलेनंतर लगेच निधी वर्ग करण्यात येईल, असे ठोस आश्वासन अजित पवार यांनी दिले. निधी संदर्भात आमदार महेश लांडगे यांनी नागपूर अधिवेशनात लक्षवेधी मांडली होती. तसेच आमदार लक्ष्मण जगताप यांनी बजेट मध्ये तरतुदी पाठपुरावा केला होता..
भेटीनंतर पिंपरी कोर्टाचे नेहरूनगर येथील इमारतीत लवकरच स्थलांतर होऊन शहराची न्याय व्यवस्था बळकट होणेसाठी आणखी कनिष्ठ स्तर, वरिष्ठस्तर, सेशन कोर्ट, मोटर वाहन कोर्ट इ. न्यायालये पिंपरी चिंचवड शहरात लवकरच सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असा आशावाद अध्यक्ष ॲड. दिनकर बारणे व शिष्ट मंडळाने व्यक्त केला.














