- इतर अधिकाऱ्यांना गोत्यात आणण्यासाठी उपसले ‘पत्रवारी’ चे हत्यार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ सप्टेंबर २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांचे कुटुंबातील सदस्य व्यापार, व्यवसाय करतात याची माहिती द्यावी, असा अर्ज पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी दिला आहे. ठेकेदारांकडून थेट आपल्या बँक खात्यात लाच म्हणून रक्कम स्वीकारल्याने इतर अधिकाऱ्यांना गोत्यात आणून दबाव वाढविण्यासाठी डॉ. रॉय यांनी ही माहिती मागविल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.
पालिकेच्या वायसीएम रुग्णालयासाठी शस्त्रक्रियेसाठी मशिन खरेदीची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. मशिन पुरविणाऱ्या श्री कन्स्ट्रक्शनकडून डॉ. रॉय व आणखी दोघांनी खात्यावर लाच स्वीकारली होती. त्यावर आयुक्तांनी कारवाई केली आहे.
डॉ. रॉय यांनी प्रशासन विभागास माहिती अधिकार कायद्याअंतर्गत पत्र दिले आहे. पालिकेच्या किती अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कुटुबांतील सदस्य व्यापार व व्यवसाय करीत आहेत, अशी माहिती सन २०१५ पासून किती जणांनी पालिकेस दिली आहे. त्या संदर्भातील कागदपत्रे उपलब्ध करून द्यावेत, असे रॉय यांनी अर्जात नमूद केले आहे. आयुक्तांनी कारवाई केल्याने इतर अधिकाऱ्यांना गोत्यात आणून दबाव वाढविण्यासाठी डॉ. रॉय यांनी हे पाऊल उचलल्याची चर्चा पालिका वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.