- नागरिकांची एकूण १ कोटी ४० लाख रुपयांची बिले केली कमी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० सप्टेंबर २०२०) :- कोरोनाबाधित रुग्णांकडून अधिक दराने बिले आकारणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरातील २१ खासगी रुग्णालयांना नोटीस बजावून कारवाई केली आहे. तसेच, ५ हजारांचा दंड आकारला आहे. नागरिकांची एकूण १ कोटी ४० लाख रुपयांची बिले कमी करून ती त्यांना परत केली आहेत, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.
कोरोना उपचारांच्या दराबाबत राज्य शासनाने खासगी रुग्णालयासाठी नियमावली जाहीर केली आहे. कोरोनाच्या उपचारामध्ये खासगी रुग्णालयाकडून लूट होत असल्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. या तक्रारी निवारणासाठी विभागीय आयुक्तांच्या आदेशावरून आयुक्त हर्डीकर यांनी १० सदस्यीय समिती नियुक्त केली होती.
या समितीने गेल्या महिन्याभरात प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार संबंधित रुग्णालयाची पाहणी केली. बिलांची तपासणी केली. अधिक बिले आकारलेल्या रुग्णालयांवर कारवाई केली आहे. आयुक्त म्हणाले की, शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार दर आकारणी करणे अपेक्षित आहे. मात्र, काही रुग्णालय अवाजवी पद्धतीने बिलाची वसुली करीत आहेत. तक्रारी तपासून कारवाई केली जात आहे. ज्यांना अधिक रकमेची बिले आकारली आहेत. त्यांनी पालिकेकडे आवश्यक कागदपत्रांसह तक्रार करावी, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.