- सत्ताधारी भाजपच्या कारभारावर देखील सोडले टीकास्र…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑक्टोबर २०२०) :- यापुढे मी नगरसेवकांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार आहे. आम्ही पालिकेतील पूर्ण भ्रष्टाचार उखडून काढणार आहोत. आमची विरोधाची धार वाढणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांबाबत सत्ताधाऱ्यांनी आडवा आणि जिरवाची भूमिका घेतल्यास अडविणाऱ्याची जिरविणार आहोत, असे डॉ. अमोल कोल्हे म्हणाले.
पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक आज (शुक्रवारी) आकुर्डीत पार पडली. कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नाना काटे, अजित गव्हाणे, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसेविका सुलक्षणा धर आदी उपस्थित होते.
पालिकेच्या निविदा रात्री-अपरात्री मंजूर केल्या जात आहेत. नदी सुधार प्रकल्पाचे काय झाले. पाईप पडून आहेत. पाण्याचे कोणतेही नियोजन नाही. रॅपिड अँटीजेन टेस्टचे रिपोर्ट येण्यास दोन दिवस आणि आरटीपीसीआरचे रिपोर्ट येण्यास दहा दिवस लागत आहेत. हा अतिशय अक्षम्यपणा आहे. महापालिकेने कोरोना कालावधीत केलेल्या खरेदीवर आक्षेप आहेत. खरेदीत पाणी मुरत आहे. हे मयतावरच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार आहे, असा जोरदार हल्ला कोल्हे यांनी सत्ताधारी भाजपवर चढविला.