न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ ऑक्टोबर २०२०) :- प्रत्येक माणसाच्या मनाच्या कोपऱ्यात एक पोलीस असतो. त्यात प्रत्यक्ष पोलीस म्हणून कर्तव्य बजावलेली व्यक्ती आयुष्यभर पोलीसच असतो. एक व्यक्ती म्हणून ते सेवेतून निवृत्त होतात. मात्र, त्यांच्यातील पोलीस कधीही निवृत्त होत नाही, असे मत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी व्यक्त केले.
पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत कार्यरत असलेल्या कार्यालय अधीक्षक पुष्पलता रवींद्र कदम, सहायक पोलीस फौजदार रविकांत आकाराम जाधव तसेच सहायक पोलीस फौजदार बाबासाहेब दादाबा केदार यांचा सेवानिवृत्तीनिमित्त चिंचवड येथे आयुक्तालयात बुधवारी सत्कार झाला. त्यावेळी आयुक्त कृष्ण प्रकाश बोलत होते.
पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ व सहायक पोलीस आयुक्त राजाराम पाटील या वेळी उपस्थित होते. आस्थापना कार्यालयातील प्रमुख लिपिक सोमनाथ आडसूळ व कनिष्ट लिपिक संग्राम कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.
पुष्पलता कदम या १९८४ मध्ये कनिष्ठ लिपिक म्हणून सांगली जिल्ह्यात भरती झाल्या होत्या. त्यांनी कोल्हापूर, बिनतारी संदेश विभाग पुणे, त्यानंतर २०१९ मध्ये पिंपरी चिंचवड येथे कार्यालय अधीक्षक म्हणून कर्तव्य बजावले. सहायक फौजदार रविकांत जाधव हे १९८१ मध्ये पुणे शहर पोलीस दलात पोलीस शिपाई या पदावर भरती झाले होते. सहायक फौजदार बाबासाहेब केदार हे १९९० मध्ये राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ५ दौंड येथे भरती झाले होते.


















