न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. ०१ डिसें.) :- राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीम. सोनिया दुहन यांनी शनिवार (दि.१) रोजी चिंचवडच्या विकास शिक्षण मंडळ संचलित श्री. शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयाला सदिच्छा भेट दिली.
विद्यालयातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्याकरिता विद्यालयात विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेल्या भौतिक तसेच शैक्षणिक सुविधांची त्यांनी या वेळी पाहणी केली. विद्यालयातील आधुनिक गणित आणि इंग्रजी विषयांच्या प्रयोगशाळा, तसेच अत्याधुनिक भूगोल प्रयोगशाळा पाहून त्यांनी विद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्वल असल्याचे सांगितले. याशिवाय विद्यालयाचे प्रशस्त ग्रंथालय, आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, आणि विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीला चालना देणाऱ्या सायन्स सेंटरची पाहणी केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रगतीकरिता झटणाऱ्या संस्थापक-अध्यक्ष आण्णासाहेब जाधव यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले.
विद्यालयातर्फे उपाध्यक्ष जगदीश जाधव आणि संचालक अमित बच्छाव शहर-उपाध्यक्ष – पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस, यांच्या शुभहस्ते कु. सोनिया दुहन यांचा प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराची प्रतिकृती, लोकमान्य टिळकांची शान असलेली पुणेरी पगडी, उपरणे, पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
विद्यालयाचे संचालक विजय जाधव, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक बाळाराम पाटील, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका प्रतिभा देशपांडे हेही याप्रसंगी उपस्थित होते.
या प्रसंगी युवकांमध्ये जागृती निर्माण केल्याबद्दल आणि शैक्षणिक, सामाजिक तसेच विकासाच्या क्षेत्रात आमुलाग्र परिवर्तन आणि प्रगती साधल्याबद्दल विद्यालयातर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले. विद्यालयातील नाविन्यपूर्ण उपक्रम, सुसज्ज आणि अत्याधुनिक प्रयोगशाळा याविषयी बोलताना श्रीम. सोनिया दुहन म्हणाल्या कि ह्या सुविधा आणि हे उपक्रम पाहून माझ्यातील विद्यार्थी पुन्हा जागृत झाला. अशा सुविधा आणि अशा प्रयोगशाळा मी यापूर्वी कधीही पाहिल्या नव्हत्या. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता सतत अथक परिश्रम करणारे अण्णासाहेब जाधव खरंच वंदनीय आहेत. त्यांच्या या शैक्षणिक कार्यास लाख लाख शुभेच्छा, अशा शब्दांत त्यांनी विद्यालयाचे आणि अण्णांचे कौतुक केले. विद्यालयातील विद्यार्थ्यांना त्यांनी सकारात्मक दृष्टीकोनातून आणि डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम, सरोजिनीदेवी नायडू यांसारख्या थोर व्यक्तिमत्वाचा आदर्श डोळ्यापुढे ठेऊन यशस्वी जीवनाकरिता मार्गदर्शन केले.
पर्यवेक्षक अनिल कर्पे यांनी सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.