न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ डिसें.) :- पिंपरी चिंचवड महापालिकेचा स्मार्ट सिटीत समावेश झालेला आहे. या योजनेंची सर्वात मोठी निविदा २५० कोटी रुपयांची काढण्यात येत आहे. त्या निविदा प्रक्रियेत रिंग करण्यात आल्याचा आरोप सत्ताधारी भाजपच्याच काही पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. सत्ताधारी भाजपचे नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी स्मार्ट सिटीच्या २५० कोटीच्या कामामध्ये रिंग झाल्याचा आरोप करुन ते काम एका विशिष्ट कंपनीलाच देण्याचा प्रयत्न चालू आहेत. याबाबत तांत्रिक मुद्दे उपस्थित करुन फेरनिविदा काढण्याची मागणी केलीय. याआधीही विरोधी पक्षांनी या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले होते. परंतु, आता स्वपक्षीयच याबाबत संदेह निर्माण करीत आहेत. त्यामुळे या प्रक्रियेमध्ये काहीतरी काळेबेरे असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला आहे.
स्मार्ट सिटीचे कंत्राट सत्ताधाऱ्यांकडून एल अँण्ड टी कंपनीस देण्याचा जोरदार प्रयत्न सुरु आहे. त्या कंपनीला काम देण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातून दबाब येत आहे. या निविदेमध्ये प्री- बिड मिटींगला अनेक कंपन्या येवूनही त्या सहभागी का होऊ शकल्या नाहीत? त्यांच्या लेखी मागण्यांचा विचार का झाला नाही? निविदेला ४ वेळा मुदतवाढ का देण्यात आली? सदर कंपनीची निविदा सुमारे ८.३४ टक्के वाढीव असूनही त्या कंपनीलाच काम देण्याचा अट्टाहास का? यामध्ये सुमारे २१ कोटी ज्यादा दराने निविदा प्राप्त झाली आहे. असे अनेक प्रश्न उपस्थित होवू लागले आहेत.
एका विशिष्ट कंपनीसाठी अटी व शर्ती पूर्वनियोजित करुन नियोजनबध्द महापालिकेचा पैसा लुटण्याचा उपक्रम स्मार्ट सिटी योजनेतून सुरु केला आहे. या शहरात ना भय ना भ्रष्ट्राचार, पारदर्शक कारभार, साफ नियत सही विकास या भाजपच्या घोषणांना स्थानिक भाजपचे पदाधिकारी सोयीस्करपणे हरताळ फासत आहेत. राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचा या निविदेला तीव्र विरोध करीत असून सदरची निविदा रद्द करुन फेरनिविदा प्रक्रीया राबविण्यात यावी. अन्यथा राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षांच्या वतीन तीव्र आंदोलन करण्यात येईल, तसेच उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल. असा इशारा दत्ता साने यांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे.















