- ठेकेदार कंपन्या टेक महिंद्रा आणि क्रिस्टलला नोटीस…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २४ जुलै २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेची ई-ऑफिस अर्थात डॉक्युमेंट मॅनेजमेंट सिस्टम (डीएमएस) गेल्या पंधरा दिवसांपासून बंद असल्याने प्रशासनाचे ऑनलाइन कामकाज विस्कळीत झाले आहे. डेटा सेंटरमधील तांत्रिक बिघाडामुळे ही समस्या निर्माण झाल्याचे समोर आले असून, या प्रकरणी डेटा सेंटरचे संचालन करणाऱ्या टेक महिंद्रा आणि क्रिस्टल या कंपन्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
महापालिकेच्या विविध विभागांचे दैनंदिन कामकाज, ई-टपाल, फाइल प्रक्रिया आणि कागदपत्रांचे व्यवस्थापन डीएमएसद्वारे केले जाते. मात्र, प्रणाली बंद पडल्यामुळे अनेक विभागांतील कामे रखडली असून सर्वाधिक फटका बांधकाम परवानगी विभागाला बसला आहे. त्यामुळे परवानग्यांची प्रक्रिया ठप्प होऊन महापालिकेच्या महसुलावरही परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे.
या विषयावर स्थायी समितीच्या बैठकीत जोरदार चर्चा झाली. सदस्यांनी वारंवार बिघाड होत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित ठेकेदार आणि सल्लागार कंपन्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. कोट्यवधी रुपये खर्च करूनही प्रणाली सातत्याने बंद पडत असल्याने जबाबदार कंपन्यांना ब्लॅकलिस्ट करण्याची मागणीही बैठकीत करण्यात आली.
स्मार्ट सिटी प्रशासनाने संबंधित कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून प्रणाली तातडीने पूर्ववत करण्याचे आदेश दिले आहेत. माहिती व तंत्रज्ञान विभागानेही यंत्रणा पूर्ण क्षमतेने सुरू न झाल्यास पर्यायी व्यवस्था करण्याचा इशारा दिला आहे.
याबाबत सहायक आयुक्त अमित पंडित यांनी सांगितले की, डेटा सेंटर बंद असल्यामुळे डीएमएस प्रणाली कार्यरत नाही. डेटा सेंटरची जबाबदारी टेक महिंद्रा आणि क्रिस्टल या कंपन्यांकडे असून त्यांना नोटीस देण्यात आली आहे. तातडीने सेवा पूर्ववत न झाल्यास पर्यायी व्यवस्था करण्यात येईल आणि त्यामुळे होणाऱ्या परिणामांची जबाबदारी महापालिकेवर राहणार नाही.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी किराज यादव यांनीही संबंधित कंपन्यांना नोटीस बजावल्याची पुष्टी केली असून आयुक्तांच्या निर्देशानुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले.


















