एम्सच्या टीमने सुशांतच्या हत्येचा दावा फेटाळला; अखेर ती ठरली आत्महत्याच…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ ऑक्टोबर २०२०) :- एम्स रुग्णालयाकडून सुशांत सिंहच्या मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी प्रयत्न सुरु होता. यासाठी डॉक्टर सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्त्वाखाली तज्ञ डॉक्टरांची एक टीम तयार करण्यात आली होती. डॉक्टरांच्या टीमने अभ्यास पूर्ण करुन सीबीआयकडे रिपोर्ट सोपवला होता. या रिपोर्टमध्ये बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंहच्या हत्येचा दावा पूर्पणणे फेटाळण्यात आला असून सुशांतने आत्महत्या केल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, एम्सचे डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी सुशांतचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला असून हत्येचा दावा फेटाळला असल्याचं सांगितलं आहे. सीबीआयने एम्स रुग्णालयाकडे पोस्टमॉर्टम तसंच व्हिसेरो रिपोर्टचा अभ्यास करण्याची विनंती केली होती.
एम्स डॉक्टरांनी दिलेली माहिती आणि सीबीआय तपासात समोर आलेल्या गोष्टी एकत्र करुन पडताळून पाहिल्या जात आहेत. सूत्रांनुसार, एम्सच्या डॉक्टरांनी दिलेली माहिती तज्ञांचं मत म्हणून ग्राह्य धरलं जाणार असून त्यांना साक्षीदार म्हणूनही उभं केलं जाऊ शकतं.


















