- सत्र न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल; मात्र, ईडीकडून क्लोजर रिपोर्टला विरोध…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ ऑक्टोबर २०२०) :- महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक कथित घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी अजित पवार यांच्यासह ६९ जणांना क्लीन चीट मिळली आहे. मुंबई पोलिसांकडून सत्र न्यायालयात आज क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक २५ हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांवर ईडीने गुन्हा दाखल केला होता. नियमबाह्यरित्या कर्ज वाटप केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. परंतु, त्यांच्याविरोधात पुरेसे पुरावे नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. बँकेच्या ३४ शाखांमधील कथित घोटाळ्यासंबंधित वर्षभर केलेल्या तपासणीत कोणताही पुरावा किंवा अनियमितता आढळली नसल्याचा दावा या अहवालात केला आहे. पोलिसांनी ईडीलाही क्लोजर कॉपी पाठविली. मात्र, ईडीने न्यायालयात क्लोजर अहवालाला विरोध दर्शविला, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
आम्ही हजारो कागदपत्रे, लेखापरीक्षण अहवाल आणि १०० हून अधिक व्यक्तींची चौकशी केली. हेदेखील समोर आले की, पवार कधीच कोणत्याही बैठकीला उपस्थित राहिले नव्हते आणि निविदा प्रक्रियेत त्यांनी कोणतीही भूमिका निभावली आहे हे दर्शविण्यासाठी कोणताही पुरावा नाही, असे एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.


















