- पालिकेकडून शहरात माजी सैनिकांची कोविड उपद्रव निरीक्षक म्हणून नियुक्ती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ ऑक्टोबर २०२०) :- पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव, प्रसार वाढत आहे. थुंकीतून विषाणूचा प्रसार होत आहे. असे असतानाही सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-यांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे आता मास्कविना फिरणा-यांवर माजी सैनिक कारवाई करणार आहेत.
कोविड उपद्रव निरीक्षक म्हणून सहा महिन्यांसाठी ५० माजी सैनिकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या माजी सैनिकांना दरमहा दहा हजार रुपये मानधन आणि दंड वसुलीवर ३० टक्के प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला बुधवारी (दि. ७) स्थायी समिती सभेत आयत्यावेळी मान्यता दिली.
पालिकेने पुण्यातील आर्मींचे ऑफिसर इनचार्ज यांच्यांशी पत्रव्यवहार केला होता. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी कर्नल जगभान यांच्याशी १४ जुलै रोजी बैठक घेतली होती. मानधन आणि प्रोत्साहन भत्याची प्रत्यक्ष होणारी रक्कम भांडार विभागातील कोविड निधीतून खर्च केली जाणार आहे.


















