न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ ऑक्टोबर २०२०) :- आकुर्डीतील तहसील कार्यालयात लिपिकाकडे च-होलीतील अर्जदाराने पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत त्यांच्या जमिनीचे बिनशेती परवाना करण्यासाठी २९ जुलै रोजी अर्ज केला होता. ७ सप्टेंबर रोजी अर्जदारास विनिश्चीती सनद देण्यात आली. त्यानंतर १५ सप्टेंबर रोजी ‘बिनशेती परवाना देण्यासाठी फिर्यादी हे प्रती गुंठा पाच हजार रुपयांची मागणी करत आहेत, असा अर्जदाराने उपविभागीय अधिका-यांकडे अर्ज केला. तो अर्ज चौकशीसाठी उपविभागीय कार्यालयाकडून तहसील कार्यालयाकडे आला. चौकशी करण्यासाठी अर्जदार यांना १ ऑक्टोबर रोजी बोलावण्यात आले. मात्र ते आले नाहीत. अर्जदार ७ ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयात आले.
फिर्यादी लिपिकाला विचारले असता ‘त्यांना त्यांचा बिनशेती परवाना दिला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे पैसे मागण्याचा प्रश्नच येत नाही’ असे फिर्यादी यांनी स्पष्टीकरण दिले. त्यावरून चिडून अर्जदाराने फिर्यादी लिपिकाला तहसीलदारांसमोर कानाखाली मारली. तहसीलदारांच्या केबिनवर ढकलून देत शिवीगाळ केली. सरकारी कामात अडथला आणला.
हा प्रकार बुधवारी (दि. ७) दुपारी साडेपाच वाजताच्या सुमारास अप्पर तहसीलदार कार्यालय, आकुर्डी येथे घडला. अतुल काळूराम तापकीर (वय ४५, रा. चोविसावाडी, च-होली बुद्रुक, ता. हवेली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सुनील इरन्ना कास्टेवाड (वय २९, रा. अजमेरा, पिंपरी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.















