- शहरातील नागरिकांच्या डोक्यावर शास्तीची टांगती तलवार कायम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ ऑक्टोबर २०२०) :- कोरोना संकटाने ग्रासलेल्या पिंपरी चिंचवडकरांना मिळकतकर आणि शास्तीकर माफीचा दिलासा मिळणार का?, असा सवाल नागरिक उपस्थित करू लागले आहेत. सरसकट शास्तीकर माफ करून मुंबईच्या धर्तीवर पाचशे चौरस फुटापर्यंतच्या सदनिकांना करमाफी द्यावी, अशी मागणी होत आहे.
कोरोना काळातील करमाफीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पडून आहे. सुमारे २७ लाख लोकसंख्येच्या शहरात पावणेदोन लाख अनधिकृत बांधकामे आहेत. सध्याच्या परिस्थितीचा विचार करता शहरातील कष्टकरी, कामगार, मजूर, टपरीधारक, माथाडी कामगार, किरकोळ विक्रेते, मध्यमवर्गीय, रिक्षाचालक, भाजीपाला विक्रेते, सुरक्षारक्षक, चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी यांनी अर्धा, एक आणि दीड गुंठा विकत घेऊन त्यावर घरे बांधली आहेत. त्यांच्याकडून शास्तीकर घेतला जातो. परंतु, गेल्या सहा महिन्यांत अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, कोरोना कालखंडात सामान्य नागरिकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन लोकप्रतिनिधींनी पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सरसकट शास्तीकर माफीचा प्रस्ताव दहा जानेवारीला रोजी मंजूर केला आहे. तो अंतिम मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठविला आहे. परंतु, त्यास सरकारने अद्यापही मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे नागरिकांच्या डोक्यावर शास्तीकराची टांगती तलवार कायम आहे.















