न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ ऑक्टोबर २०२०) :- आपल्या देशात बांबूच्या झाडांना अनन्य साधारण महत्व आहे. बांबूच्या कांड्या, पाने, फुलांचा वापर ग्रामीण क्षेत्रात विशेषतः आदिवासी जमातींमध्ये विविध वस्तू निर्मितीकरिता केला जातो. वातावरणातील कार्बन शोषून घेण्याचे कार्य बांबू मोठया प्रमाणात करीत असते. औषधी निर्मिती करिताही बांबूच्या वनस्पती चा वापर केला जातो. व्यावसाईक शेतीकारणास्तव त्याचप्रमाणे घराच्या आजूबाजूला तसेच घरामध्येही शोभेकरिता बांबूची लागवड केली जाते.
संपूर्ण जगामध्ये बांबूच्या १४०० पेक्षा जास्त प्रजाती आहेत. पैकी भारतात १४० जाती असून ४० प्रकारच्या जातींचा लागवडीसाठी वापर केला जातो. तसे पाहिले तर बांबू वृक्ष नसून गवत प्रणालीमध्ये त्याचा समावेश होतो. पर्यावरण तज्ञ व जाणकारांचा असा अभ्यास आहे की बांबूचे पूर्ण आयुष्य झाले की त्याला फुले लागतात. वनस्पती जगतामध्ये बांबूला फुले येणे ही दुर्मिळ घटना समजली जाते. बांबूना फुले आल्याच्या नोंदी महाराष्ट्र राज्यात फार कमी आहेत. आणि बांबूच्या “फुलोऱ्याचे” दर्शन घेणाऱ्यांची संख्याही बोटावर मोजता येईल अशीच आहे. पारंपारिक ज्ञान असणाऱ्यांच्या मते जीवनामध्ये एखाद्या वेळेसच त्यांना बांबूच्या फुलोऱ्याचे दर्शन झालेले आहे. बांबूंना फुले येण्याची घटना फार कमी वेळा अनुभवास येते. बांबूना फुले येण्याचा काळ हा त्यांच्या एकून आयुष्यातील ३५ ते ६० वर्षे या कालावधीमधील असतो. काही बांबूच्या झाडांना ९० वर्षानंतरही फुले येतात. वनस्पती शास्त्रात फुले येणे म्हणजे बांबूच्या झाडांचा अंतिम काळ समजला जातो. त्यानंतर काही दिवसात ते उन्मळून पडतात व त्यांचा मृत्यू होतो.
या संदर्भात प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष व पर्यावरण अभ्यासक विजय पाटील म्हणाले, “बांबूची बहरलेली फुले पाहण्याचा योग तसा दुर्मिळच. हिंदी भाषिक राज्यांमध्ये एक म्हण मोठी प्रचलित आहे – केला, बिच्छी, केकडा, बांस | अपने जन्मे चारो नाश | म्हणजेच काय की केळाचे झाड व बांबूचे झाड हे जन्मातून एकदाच फुल देते आणि विंचू व खेकडा पिले दिल्यानंतर मरून जातात. अश्याप्रकारे बांबू त्याच्या संपूर्ण आयुष्यात एकदाच फुलते व नष्ट होते. अश्या पद्धतीने आपल्या शहरात बांबूला फुलं आल्याची दुर्मिळ घटना आता नोंदली गेली आहे आणि त्याचे अभ्यासकांना नैसर्गिक रहस्यमयी दुर्मिळ असे बांबूच्या फुलोऱ्याचे दर्शनही होत आहे.”















