न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ डिसें.) :- ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शाॅप किपर्स फेडरेशन पुणे यांची पिंपरी येथे रविवार (दि. २) रोजी आढावा बैठक पार पडली. प्रदेशाध्यक्ष गजानन बाबर यांचा अपघात झाल्यामुळे ते बैठकीस हजर राहू शकले नाहीत.
बैठकीस जेष्ठ कार्याध्यक्ष वसंत अग्रवाल, प्रदेश खजिनदार विजय गुप्ता, प्रदेश उपाध्यक्ष मुबारक मौलवी व फेडरेशनचे पदाधिकारी व आदी उपस्थित होते.
जेष्ठ कार्याध्यक्ष वसंत अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली काही महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली. यात प्रामुख्याने १ जानेवारी २०१९ पासून जे आंदोलन करण्याचे ठरविले होते, ते गजानन बाबर यांची प्रकृती बरी नसल्याने तूर्तास पुढे ढकलण्यात आले आहे. पुरवठा सचिव यांनी गजानन बाबर यांचेशी दूरध्वनीच्या माध्यमातून चर्चा केली आहे. अधिवेशन संपताच अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट व प्रदेशाध्यक्ष गजानन बाबर यांच्याबरोबर फेडरेशनची बैठक होणार आहे.
प्रदेश खजिनदार विजय गुप्ता म्हणाले की, न्यायालयीन बाबींसाठी दुकानदार यांनी संघटनेचे सभासद होणे अत्यंत गरजेचं आहे. तसेच फेडरेशनच्या ज्या जिल्हाध्याक्षांकडे पावतीपुस्तके आहेत त्यांनी ती ताबडतोब जमा करावीत. तसेच काही जिल्हाध्यक्ष बैठकीस हजर राहू शकले नाहीत, त्यांनी दूरध्वनीवरून फेडरेशन जो निर्णय घेईल त्यांच्याशी आम्ही बांधील आहोत, असे आश्वासन दिले आहे.
जे पदाधिकारी केवळ नाव व प्रसिद्धीसाठी फेडरेशनमध्ये कामे करीत आहेत व फेडरेशनमध्ये राहून फेडरेशनमध्ये फूट पाडण्याचे कामे करीत आहेत, अशा पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत प्रदेशाध्यक्ष गजानन बाबर यांच्या उपस्थितीत निर्णय घेण्यात येणार असल्याचे, विजय गुप्ता यांनी सांगितले आहे.












