न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ डिसें.) :- माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भाऊसाहेब भोईर मित्र परिवाराच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. ९, १० आणि ११ डिसेंबर रोजी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे नाट्यगृह येथे शरद पवार यांच्या ५० वर्षीय कालखंडांमध्ये राजकीय आणि सामाजिक कारकीर्दीस साथ देणाऱ्या जिल्ह्यातील मान्यवरांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रम प्रसंगी मावळ व पिंपरी चिंचवड परिसरातील मान्यवरांच्या गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे, असे भाऊसाहेब भोईर यांनी सांगितले आहे. यावेळी कृष्णराव भेगडे, नानासाहेब नवले, अशोक मोहोळ, मदन बाफना, माउली दाभाडे, बबनराव भेगडे, ज्ञानेश्वर लांडगे, शामराव पाळेकर, रमेशचंद्र ढमाले, गंगाशेठ होनराव, दिगंबरशेठ काळभोर, विठ्ठल काळभोर, श्रीरंग शिंदे, हिरामण बारणे, राम आधार धारिया, सुनीता धुमाळ आदी मान्यवरांचा सन्मान होणार आहे.
यावेळी नाट्य, कला व संगीत महोत्सव व महिलांसाठी सौदर्य स्पर्धा, खेळ रंगला पैठणीचा अर्थात न्यू होमी मिनिस्टर, लावणी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे, तसेच तरुणांसाठी वक्ता कसा असावा व नेतृत्वगुण कसे वाढवावे या विषयावर व्याख्यान व प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आला आहे. या नाट्य कला व संगीत महोत्सवामध्ये रंगभूमी गाजवलेले वस्त्रहरण आणि झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळ्यात चार नामांकने मिळालेले ‘नवरी छळे नवऱ्याला’ हा नाट्यप्रयोग सादर होणार असून, ग. दि. माडगूळकर, सुधीर फडके, पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दिनिमित्त ‘लेणे प्रतिभेचे’ या गीत, संगीत, नृत्य, दृक्श्राव्य आविष्काराची मैफिल आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार असल्याचे भाऊसाहेब भोईर मित्र परिवाराचे अध्यक्ष व नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.












