न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ डिसें.) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची आज मंगळवार (दि. ४ ) रोजी स्थायी समितीची सभा पार पडली. सभापती ममता गायकवाड या काही अज्ञात कारणामुळे बैठकीस अनुपस्थीत राहिल्या होत्या. त्यांच्या अनुउपस्थितीत अनुभवी आणि वरिष्ठ या नात्याने स्थायी समिती सभापतीपद भुषविण्याची संधी स्थायी समिती सदस्य विलास मडिगेरी यांना मिळाली. सभापती विलास मडिगेरी यांच्या उपस्थितीत पिंपरी चिंचवड शहरातील एकूण ९३ कोटींच्या विकासकामांना मजुरी देण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवडमधील प्रभाग क्रमांक तीन च-होली परिसरात रस्ते विकसित करण्यासाठी ५० कोटी रुपयांच्या खर्चाला स्थायी समितीने आज मंजुरी दिली. ३० मीटर डीपी रस्ता विकसित करण्यासाठी एकूण ३८ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. च-होलीतील सर्व्हे क्रमांक ५१९ ते ४७५ पर्यंतचा ३० मीटर डीपी रस्ता विकसित करण्यात येणार आहे. या कामाचे कंत्राट धनेश्वर कन्स्ट्रक्शनला देण्यात आले आहे. साईमंदिर, कोतवालवाडी, च-होली गावठाण या परिसरातील रस्ते विकसित करण्यासाठी दहा कोटी सत्याहत्तर लाख ब्याऐंशी हजार रुपये खर्च येणार असून, या कामासाठी श्रीगणेश कन्स्ट्रक्शन या ठेकेदारास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.
तसेच भोसरी येथील सर्व्हे क्रमांक १ मध्ये गावजत्रा मैदानालगत आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. ‘मारुतराव रावजी लांडगे आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्र’ असे या कुस्ती केंद्राचे नाव असणार आहे. आठ हजार सहाशे चौरस मीटर जागेत पाच हजार सातशे साठ चौरस मिटर क्षेत्रफळामध्ये हे केंद्र उभारण्यात येणार आहे. याकामी ९ कोटी १४ लाख रुपये दर ठरवून निविदा मागविण्यात आल्या आहेत. या कामासाठी स्थायी समितीने आज मंजुरी दिली आहे. बी. के. खोसे या ठेकेदाराने या कामासाठी निविदा दारापेक्षा कमी रकमेची निविदा सादर केली आहे.












