न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ डिसें.) :- पिंपरी विधानसभेचे आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांनी शिक्षण विभागाची चूक हेरून शिक्षण विभागाच्या निदर्शनास आणून दिली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शहरात १०६ प्राथमिक शळा आहेत. या शाळांमध्ये सुमारे ४० हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य घडत आहे. विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी शिक्षण विभागाने १०५ शिक्षकांची भरती काढली आहे. त्यासाठी जाहीरात नुकतीच प्रसिध्द देखील केली आहे. अर्ज करणा-या उमेदवारांसाठीच्या अटी-शर्ती नमूद करताना मागासवर्गीय उमेदवारांची वयोमर्यादा १८ ते ३८ अशी चुकीची दर्शविली आहे.
शासनाच्या सुधारित अध्यादेशानुसार मागासवर्गीय उमेदवारांची वयोमर्यादा ४३ वर्षापर्यंत आहे. मात्र, शिक्षण विभागाने ही मर्यादा ३८ वर आणून शासन नियम व आदेशाचा भंग केला आहे. याप्रकरणी सुधारित शुध्दीपत्रक काढून व अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात यावी, अशी सूचना आमदार चाबुकस्वार यांनी आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्याकडे केली आहे.
शिक्षण विभागाने मागासवर्गीय उमेदवारांसाठीची वयोमर्यादा चुकीची दर्षविल्याने शिक्षण विभागाकडून शासन नियमांचे उल्लंघन झाले असून, संबंधित प्रशासन अधिका-यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याची खंतही आमदार चाबुकस्वार यांनी आयुक्तांपाशी बोलून दाखविली आहे.












